गाळ उपशाला प्रारंभ करताच देवडेतील काजळी नदीपात्र झाले अधिक विस्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST2021-08-14T04:37:26+5:302021-08-14T04:37:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पुनित झालेले, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले नयनरम्य गाव म्हणजेच ...

As soon as the sludge was removed, the soot in the river became wider | गाळ उपशाला प्रारंभ करताच देवडेतील काजळी नदीपात्र झाले अधिक विस्तीर्ण

गाळ उपशाला प्रारंभ करताच देवडेतील काजळी नदीपात्र झाले अधिक विस्तीर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पुनित झालेले, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले नयनरम्य गाव म्हणजेच संगमेश्वर तालुक्यातील देवडे आदिष्टीवाडी. नऊ खोऱ्यांनी नटलेले आणि गनिमी काव्याचे उत्कृष्ट उदाहरण असलेल्या विशाळगडाच्या पायथ्याशी, काजळी नदीचा उगम अंगावर झेलीत असलेले रमणीय गाव. नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने आणि लोकसहभागातून या गावातून वाहणाऱ्या विस्तीर्ण काजळी नदीच्या पात्रातील गाळ उपसा करण्याच्या कामाला पहिल्या टप्प्यात प्रारंभ झाला आणि या नदीचे पात्र अधिकच विस्तीर्ण झाले.

पावसाळ्यात देवड्याच्या सौंदर्यात अधिक भर घालतात ते या गावातील धबधबे. सांबरखिंड, कुडव, बामणपात्र, दोरांबे, म्होवाचा कडा, कोंगिवरे, धुमक व्हाळ, कळंबचे खोरे, ब्रिटीशकालीन वात खडवा अशी या धबधब्यांची नावे असून, या खोऱ्यांमधून बाराही महिने पाणी वाहत असते. पूर्वीचे बारा बलुतेदार असलेले हे स्वयंपूर्ण खेडे, आजही गुण्यागोविंदाने नांदत आहे. १९५० साली ग्रुप ग्रामपंचायत अस्तित्वात आली. या नदीचा उगम या गावातून होत असल्याने हे पात्र अतिशय विस्तीर्ण असे आहे. या पात्रातील गाळ उपसा झाल्यास भविष्यात पुराचा धोका निर्माण होणार नाही, या उद्देशाने ग्रामपंचायतीने गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली. गावातील धडपड्या तरूण अनिल कांबळे आणि ग्रामपंचायतीच्या अन्य ज्येष्ठ ग्रामस्थांनी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनशी संपर्क केला आणि लागलीच या फाऊंडेशवनच्या मदतीने या उपक्रमाला सुरूवातही झाली. देवडे - वाडीअधिष्ठी ग्रामपंचायत हद्दीतील काजळी नदी गाळ उपसा व नदी पुनर्जीवन मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला २५ मार्च रोजी प्रारंभ झाला. नाम फाऊंडेशनचे कोकण समन्वयक समीर जानवलकर, सरपंच राजेश राणे, उपसरपंच रश्मी जंगम आणि ग्रुपग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच डाॅ. शशिकांत चिंचवलकर, ज्येष्ठ ग्रामस्थ प्रकाश बेर्डे, दयानंद चिंचवलकर तसेच देवडेतील अन्य ग्रामस्थ, कोंडगावचे सरपंच बापू शेट्ये, भडकंब्याचे उपसरपंच बापू शिंदे आदींच्या उपस्थितीत सोमलिंग मंदिरात गाळ उपसा मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ झाला.

नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने सर्व अद्ययावत मशिनरी गावात दाखल झाली. गाळ उपशाला सुरूवात झाली. शासकीय यंत्रणेकडून या कामाकरिता १५ लाख रक्कम मंजूर झाली. त्यातील ५० टक्के रक्कम सुरूवातीलाच मिळणार होती. परंतु, तेवढ्यात कोरोना महामारी सुरू झाल्याने ही रक्कम कोरोनासाठी वर्ग करण्यात आली. आता पुढे काय, असा प्रश्न ग्रामस्थांना सतावू लागला. मात्र, ‘गाव करी ते राव न करी’, या उक्तीप्रमाणे लोकसहभागातून सुमारे दहा लाखांपर्यंत रक्कम गोळा करण्यात आली आणि नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने गाळ उपशाला सुरूवात झाली. अंदाजे ७०० मीटर लांब व ४० मीटर रुंद, खोली साधारण २ मीटरचे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, पाऊस लवकर सुरू झाला. त्यामुळे मे अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यात ६० हजार क्युबिक मीटर इतका गाळ काढण्यात आला. त्यामुळे या नदीतील सहा करोड लीटर पाणीसाठा वाढला. त्यामुळे पुढच्या वर्षी दुसरा टप्पाही पूर्ण करण्याचा निर्धार या ग्रामपंचायतीने आणि देवडे वाडीअधिष्ठी ग्रामस्थांनी केला आहे.

..........

ग्रामस्थांची एकी आणि नाम फाऊंडेशनचा मदतीचा हात...

नदीच्या दोन्ही बाजूला २ मोठ्या विहीरी काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावात पिण्याचे मुबलक पाणी व तिबार पीक घेता येणार आहे. नाम फाऊंडेशनने केलेल्या अनमोल सहकार्यामुळे आणि देवडे वाडीअधिष्ठी ग्रामस्थांच्या एकीमुळे काजळी नदी पुनर्जीवन मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. पुढच्या वर्षी या मोहिमेसाठी लागणारा निधी उभारून दुसरा टप्पाही यशस्वी करण्याचा निर्धार या ग्रामस्थांनी केला आहे.

Web Title: As soon as the sludge was removed, the soot in the river became wider

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.