मुख्यालयी कोणीच थांबेना...
By Admin | Updated: February 15, 2015 23:41 IST2015-02-15T22:10:16+5:302015-02-15T23:41:33+5:30
आदेश डावलले : शासकीय कर्मचाऱ्यांचा अशीही पायमल्ली

मुख्यालयी कोणीच थांबेना...
फुणगूस : शासकीय कर्मचाऱ्यांनी नोकरीच्या ठिकाणी मुख्यालय कार्यक्षेत्रातच राहण्याच्या शासनाच्या आदेशाला थेट केराची टोपली दाखवली जात आहे. संबंधित विभागाने याची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे कैफीयत मांडू, असा इशारा पालकांनी दिला आहे.शिक्षणापासून वंचित राहू नये, शिक्षणाचा दर्जा उंचावला जावा, यासाठी शासनाने मोफत शिक्षण कायदा अंमलात आणला असून मुलांना शिक्षणाची ओढ लागावी, तो सुदृढ व्हावा याकरिता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार, शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, मोफत प्रवास आदी नवनवीन योजना शासन स्तरावरुन राबविल्या जात आहेत. मात्र पटसंख्येला लागत चाललेली गळती, खालावत चाललेला दर्जा याला शिक्षण विभागाचा मनमानी कारभार समोर येत आहे.शासकीय कर्मचाऱ्यांनी नोकरी करीत असलेल्या मुख्यालय कार्यक्षेत्रातच राहवे, असे शासन आदेश असताना डिंगणी तसेच डावखोल या दोन्ही केंद्रांतर्गत येणारे बहुतांश शिक्षक आदेश धुडकावत असल्याचे दृश्य पहायला मिळते.जिल्हा परिषद मराठी केंद्रशाळा डिंगणी गुरववाडी अंतर्गत १० शाळा तर सुमारे ३५ शिक्षक तर डावखोल केंद्र शाळेंतर्गत १२ शाळा तर ३३ शिक्षक कार्यरत आहेत. यातील ठराविकच शिक्षक शासनाच्या आदेशाचे पालन करीत आहेत.
याबाबत दाद कोणाकडे मागायची, या दोन्ही शालेय केंद्राचे केंद्रप्रमुखच कार्यक्षेत्रात राहत नसल्याचे उघड होत आहे. याबाबत गंभीर दखल घेतली जावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. याविषयात शिक्षण विभाग पुडे काय करणार याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)