रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतील दागिने चोरुन शिपायाने ते अन्य ४ ते ५ बँकांमध्ये तारण ठेवून कर्ज फेडल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. या चोरीतील ५० लाखांचे ५०४.३४ ग्रॅम सोन्याचे सर्व दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील २ तोळे सोने संशयित शिपायाच्या घरातून हस्तगत करण्यात आले होते.याप्रकरणी संशयित शिपाई अमोल आत्माराम मोहिते (वय ४२, रा. टिके, रत्नागिरी) याने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेत तारण म्हणून ठेवलेले तब्बल ५० लाखांचे सोन्याचे दागिने बँकेचा कॅशिअर ओंकार कोळवणकर आणि शाखाधिकारी किरण बारये यांच्या संगनमताने बँकेच्या तिजोरीत न ठेवता परस्पर लांबवले होते. हा अपहार १८ फेब्रुवारी २०२५ ते ४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत झाला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर २१ ऑगस्ट रोजी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक केदार वायचळ, काॅन्स्टेबल सतीश राजरत्न व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. त्यांनी संशयित अमोल मोहिते याची कसून, चौकशी केल्यावर त्याने २ तोळे सोने आपल्या घरात ठेवून इतर सोन्याचे दागिने रत्नागिरीतील ४ ते ५ बँकांमध्ये तारण ठेवून ३५ लाखांचे कर्ज काढल्याचे पोलिसांना सांगितले.शाखाधिकाऱ्याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्जदरम्यान, या गुन्ह्यातील इतर दोन संशयितांपैकी शाखाधिकारी किरण बारये याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर सुनावणी होणे बाकी आहे.
Ratnagiri: शिपायाने दागिने चोरून बँकांचे फेडले कर्ज, कर्ला शाखेतील अपहार प्रकरणी पोलिस तपासात समोर आली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:35 IST