वेरवलीत रेल्वे रुळावर माती
By Admin | Updated: June 20, 2014 00:20 IST2014-06-20T00:17:06+5:302014-06-20T00:20:14+5:30
कोकण रेल्वे विस्कळीत : दीड तास वाहतूक ठप्प

वेरवलीत रेल्वे रुळावर माती
रत्नागिरी : धुवाधार कोसळणाऱ्या पावसामुळे आज, गुरुवारी वेरवली खुर्द मांडवकरवाडी येथील चॅनल क्र. २४७/१-२ येथे भल्या मोठ्या दगडांसह माती मोठ्या प्रमाणात रेल्वे रुळावर आल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मात्र, काही वेळातच ही माती दूर करण्यात यश आल्याने दीड तासाच्या प्रतीक्षेनंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत झाली.
अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने आज पहाटेपासून जोरदार सुरुवात केली. संपूर्ण दिवसभर जोरदार पाऊस पडत असल्याने सायंकाळी ४.४५ वा. वेरवली खुर्द मांडवकरवाडी चॅनल क्र. २४७/१-२ येथील बोगद्याजवळ भल्या मोठ्या दगडांसह माती रुळावर आल्याने दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे रुळावर दगड, माती आल्याचे कळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेरवली येथे धाव घेऊन दगड व माती दूर करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. त्यामुळे दीड तासातच ही सेवा सुरळीत झाली.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे मांडवी एक्स्प्रेस रेल्वे विलवडे येथे थांबवून ठेवण्यात आली, तर जनशताब्दी रेल्वे आडवली येथे थांबवून ठेवण्यात आली होती. सायंकाळी या दोन्ही गाड्या मार्गस्थ झाल्या. यामुळे रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. (प्रतिनिधी)