समाजमंदिरे सौर यंत्रणेने उजळणार
By Admin | Updated: June 29, 2015 00:28 IST2015-06-28T22:50:19+5:302015-06-29T00:28:24+5:30
रत्नागिरी जिल्हा परिषद : २५ लाखांची केली तरतूद

समाजमंदिरे सौर यंत्रणेने उजळणार
रत्नागिरी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सौरपथदीप आणि समाज मंदिरामध्ये सोलर सिस्टिम बसवण्यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.वाढत्या महागाईसह विजेचे दरही दिवसेंदिवस वाढत चालल्याने ग्रामीण भागातील जनतेलाही मोठ्या प्रमाणात झळ बसत आहे. त्यातच समाजमंदिरांना विजेचा पुरवठा केल्यास त्यासाठी येणारे वीजबिल कोणी भरावे, हाही मोठा प्रश्न उपस्थित करण्यात येतो. विजेच्या बचतीसह महागाईवर मात करण्यासाठी सौरविजेचा वापर करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने समाजकल्याण विभागानेही पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील ९० समाज मंदिरांमध्ये सौलर सिस्टिम लावण्यात येणार आहे. तसेच ४२४ सौरपथदीप ठिकठिकाणी दलित वस्त्यांमध्ये लावण्यात येणार आहेत.सौर विजेमुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत होतेच शिवाय या सौरऊर्जेवरील खर्चही कमी असल्याने हे सौर दिवे समाजमंदिरामध्ये परवडणारे ठरणार आहेत. समाजकल्याण विभागाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात येत आहे. त्यासाठी समाजकल्याण विभागाने २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये सोलर सिस्टिमसाठी १५ लाख रुपये आणि सौरदिव्यांसाठी १० लाख रुपयांचा समावेश करण्यात आला आहे. हे १०० टक्के अनुदानातून देण्यात येणार आहेत.त्यामुळेसमाजमंदिराला याचा चांगला फायदा होणार आहे. जिल्ह्यात समाजकल्याण विभागातर्फे प्रथमच असा आगळा वेगळाउपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमाचे जिल्हाभरातून स्वागत करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)