समाजाला जलसाक्षरतेची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST2021-03-22T04:28:20+5:302021-03-22T04:28:20+5:30
भारताच्या सर्वेक्षणानुसार शहरी भागात दर दिवशी दर माणशी १३५ लिटर पाणी पुरते. तेच ग्रामीण भागात ६० लिटर आहे. शहरी ...

समाजाला जलसाक्षरतेची गरज
भारताच्या सर्वेक्षणानुसार शहरी भागात दर दिवशी दर माणशी १३५ लिटर पाणी पुरते. तेच ग्रामीण भागात ६० लिटर आहे. शहरी भागात १० ते २० रुपये प्रति हजार लिटर द्यावे लागते. त्यामुळे जवळजवळ ते फुकटच मिळत असल्याने त्याच्या काटकसरीच्या किंवा बचतीच्या पर्यायाबाबत आपण विचार करतो, परंतु अमलात आणण्याच्या मानसिकतेत राहत नाही. ग्रामीण भागात तर शासनाच्या विविध प्रकारच्या पाणी योजनेतून पाणी पुरवठा होत असतो. परंतु निव्वळ देखभालीसाठी ठेवलेली वर्गणीची रक्कम न भरल्यामुळे काही ठिकाणी या योजना बंद आहेत. तसेच काही ठिकाणी ढिसाळ वितरण व्यवस्था, सामग्रीची वेळेवर देखभाल न करणे, लिकेजीसवर लक्ष न दिल्यामुळे उपलब्ध साठ्यापेक्षा जास्त कुटुंबांना पाणी वाटप, जलसाक्षरतेचा अभाव आदी कारणांमुळे पाणी वाटपात अडचणी निर्माण होत आहेत. समाज प्रवासामध्ये २० रुपये लिटरने मिनरल पाण्याची बाटली घेतो. परंतु पाणी योजनेतील प्रती महिना रुपये ७० ते १०० देण्यास दिरंगाई करतो. त्यामुळे ४० टक्के लोकांमुळे ६० टक्के लोकांना पाणी वाटपात अडचणी येतात. पाणी टंचाई निर्माण होते. त्यामुळे ग्रामीण भागातील पशुधनाला देखील टंचाईला तोंड द्यावे लागते.
पाणी टंचाईवर पुढील उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रामुख्याने समाजाला जलसाक्षर करण्यासाठी प्रचार, प्रसिद्धी करणे. त्यामध्ये पाणी काटकसरीने कसे वापरावे याबाबत उद्बोधन करणे, त्यामध्ये बाथरूम, टॉयलेट, किचन अशा अनेक ठिकाणी नळ असतात. त्यापैकी एखादा तरी नळ थेंब थेंब गळत असतो. परंतु त्यासाठी वायसर घालण्याकडे सुद्धा आपण दुर्लक्ष करतो. त्यासाठी एखादा तांब्या किंवा १ लिटरचा मग ठेवा. घड्याळ लावून, तो किती मिनिटात भरला ते पाहा. त्यावरून एक लिटर पाणी साठायला इतकी मिनिटे, यावरून २४ तासात किती पाणी साठतं ते पाहा. त्याला गुणिले ३६५ केले तर? थेंबा-थेंबात महापूर दिसेल. आता हे गणित आपल्या गावात किंवा राज्यात किती घरे आहेत, त्यांना लावून पाहा. एखाद्या धरणाचा साठा थेंबा-थेंबाने संपतो, हे लक्षात येईल. आता हाच हिशेब वाहणाऱ्या नळासाठी करून पाहा. जर आपण काही काम करतो आहे, फोनवर बोलत आहे, शेजाऱ्यांशी गप्पा मारतो, ब्रश करतो, पेपर वाचत असतो... तेव्हा बादलीत सोडलेला नळ बंद करायचा राहून जातो. एका मिनिटात दहा लिटर पाणी वाहत असेल, तर आपल्या घरातून वर्षाला दहा गुणिले ३६५ असा हिशेब केला, तर भारतातील सगळे लोक कशी चूक करतात, हे लक्षात येईल.
शहरी भागापैकी ग्रामीण भागात पाणीटंचाई भीषण आहे. ग्रामीण भागात शेती, पशुधन, पशुपक्षी, बकरी, कोंबड्या, जंगली जनावरे या सर्वांचा पाणी व्यवस्थापनात समावेश करावा लागतो. त्यासाठी राजकारणविरहित पाणी व्यवस्थापन व योजना आखाव्या लागतात. त्यात लोकांनी सुद्धा अंग झटकून सहभाग देणे आवश्यक आहे. त्यासाठी येथेही जलसाक्षरता करणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील मुद्दे ठळकपणे अंतर्भूत करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील नदी, नाले यातील गाळ काढणे, खासगी व सार्वजनिक विहिरी दरवर्षी साफ करून निर्जंतुक करणे, इतिहासकालीन तळी, धरणे यातील गाळ काढणे, पूर्वीचे जलस्त्रोत, पाण्याचे पाट, डुरे (छोटा पाण्याचा साठा) खोदून गाळ काढणे, पाणलोट व्यवस्थापन करणे, त्यामध्ये डोंगराच्या माथ्यापासून खाली पायापर्यंत विविध उपचार करणे, म्हणजे वृक्ष लागवड, सलग समतल चर खोदणे, माती, सिमेंट बंधारे बांधणे, शेततळे खोदणे, कच्चे व वनराई बंधारे बांधणे आदी पाणलोट व्यवस्थापन शासनाकडून मंजूर करून घेणे. ग्रामीण भागात अशा प्रकारची कामे केल्यास त्यामधून पाण्याबाबत गावे स्वयंपूर्ण झाल्याची महाराष्ट्रात खूप उदाहरणे आहेत. अण्णा हजारेंच्या पाणी चळवळीमधून हिवरे बाजार, पोपट पाटील यांनी देखील गावे स्वयंपूर्ण केली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही नाणीज, वरवडे, पिरंदवणे आदी तसेच इतर तालुक्यात सुद्धा स्वयंपूर्ण झाली आहेत.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वरील सर्व उपाय करणे जरुरीचे आहे. त्याचबरोबर पाणी योजना सक्षम करण्यासाठी लाईट बिले, मोबाईल रिचार्ज मारणे याप्रमाणे पाणी बिलही अॅडव्हान्समध्ये घेणे आवश्यक आहे. तरच सर्वांना समान न्याय मिळेल. तसेच पाण्याच्या बचतीचे मार्ग काढणे, वितरण व्यवस्था सक्षम करणे, पाणी साठ्याच्या नियोजनानुसार पाणी वाटप करणे, पाणी वाटपातील सामग्रीची योग्य वेळेत देखभाल करणे, लिकेजीस योग्य वेळेत काढणे, समाजाला पाणी बिल वेळेत भरण्यास प्रबोधन करणेही आवश्यक आहे.
मानवाला खरोखरच जलसाक्षर व्हावयाचे असेल, तर पुढील पंचसूत्री वापरावी लागेल. पाणी वापरात काटकसर, जल पुनर्भरणाची कास, पाण्याचा पुनर्वापर, पाण्याचे प्रदूषण टाळणे, शुद्ध पाण्याचे प्राशन करणे यावर आपल्या शरीराचे निरोगीपण व तंदुरुस्ती अवलंबून असते.
- संदीप एकनाथ डोंगरे
निवृत्त कृषी अधिकारी, रत्नागिरी