सामाजिक कार्य ही आमची प्रेरणा : भुस्कुटे
By Admin | Updated: October 10, 2014 23:03 IST2014-10-10T21:40:57+5:302014-10-10T23:03:58+5:30
ज्येष्ठांसाठी सहल : दुर्गाशक्ती प्रतिष्ठानने राबवला अनोखा उपक्रम

सामाजिक कार्य ही आमची प्रेरणा : भुस्कुटे
चिपळूण : ज्येष्ठांना आपल्या समन्वयक मित्र - मैत्रिणींसमोर एक दिवस घालविण्याचा आनंद मिळावा म्हणून सहल आयोजित केली जाते. या ज्येष्ठांमध्ये माझे आई-वडील, सासू-सासरे बघते. त्यांच्या सहवासात मी करीत असलेल्या सामाजिक कार्याची प्रेरणा व आशीर्वाद मिळतात, असे मत दुर्गाशक्तीच्या अध्यक्ष अश्विनी भुस्कुटे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त दुर्गाशक्तीतर्फे चिपळुणातील ज्येष्ठांची एकदिवसीय सहल नाणिजधाम येथे नेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. या सभेमध्ये ४० ज्येष्ठांनी सहभाग नोंदविला. यावेळी दुर्गाशक्तीच्या सचिव सेजल कारेकर, खजिनदार साक्षी कोलगे, सदस्या सुनीता कारेकर, रमेश आवटी आदी सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक भुस्कुटे, हेमंत भोसले व सहकाऱ्यांनी प्रयत्न केले. नाणिजधाम येथील परिसर पाहून ज्येष्ठांनी समाधान व्यक्त केले. आपण समाजासाठी काही तरी केले पाहिजे, ही भावना लक्षात ठेवून सामाजिक भावनेतून हा ज्येष्ठांसाठी उपक्रम राबविण्यात आला, असे भुस्कुटे यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांना आनंदाचे क्षण यावेत, यासाठी सहलीच्या माध्यमातून वेगळे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे व त्यातून ज्येष्ठांना ्आनंद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. दुर्गाशक्तीच्या माध्यमातून अशा उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
चिपळूण तालुक्यात भुस्कुटे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या चालण्याच्या स्पर्धा, सहल, आरोग्यविषयक शिबिर, वैद्यकीय तपासणी असे विविध उपक्रम राबविले. या सर्वांनाच ज्येष्ठांकडून मोठा प्रतिसाद लाभला आहे. आता एक दिवसाच्या सहलीतून अशा ज्येष्ठांसाठी दुर्गाशक्ती गेली काही वर्षे प्रयत्न करीत आहे.
या विषयात काही नवीन करण्याबाबत ज्येष्ठांशी संपर्क साधत आहोत, असे त्यांनी सांगितले. विविध विषयांवर मार्गदर्शन देण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. आरोग्य, आहार व अन्य गोष्टींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. (वार्ताहर)