राजापुरात अतिवृष्टीमध्ये आतापर्यंत सुमारे ४२ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST2021-08-14T04:37:09+5:302021-08-14T04:37:09+5:30
राजापूर : तालुक्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये आतापर्यंत ४१लाख ८५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान दि. २१ ...

राजापुरात अतिवृष्टीमध्ये आतापर्यंत सुमारे ४२ लाखांचे नुकसान
राजापूर : तालुक्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये आतापर्यंत ४१लाख ८५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान दि. २१ व २३ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत झाले आहे. या तीन दिवसांमध्ये तब्बल १० लाख ७१ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद महसूल प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
पावसाच्या पहिल्या दोन महिन्यांतच तालुक्याला तब्बल पाचवेळा पूरस्थितीचा सामना करावा लागला होता. त्यातच पावसाळ्यापूर्वी चक्रीवादळाचा आणि त्यानंतर दि. २१ ते २३ जुलै दरम्यान अतिवृष्टीचा मोठा फटका तालुक्याला बसला आहे. अतिवृष्टीमुळे पुरामध्ये बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तालुक्यात ४१ लाख ८५ हजार रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद महसूल दफ्तरी करण्यात आली आहे. यामध्ये २ घरांची पूर्णत पडझड होऊन २ लाख ३ हजार ८०० रूपये, १३३ घरांची अंशत: पडझड होऊन २३ लाख ३१ हजार ४०० रूपये, १० कच्चा घरांची अंशत: पडझड होऊन ६० हजार रूपये तर ६ गोठ्यांची पडझड होऊन ६३,१०० रूपयांचे नुकसान झाले आहे.
या नैसर्गिक आपत्तीत एक म्हैस, ४ बकऱ्या, २ बैल, एक पाडा अशी सात जनावरे मृत्यूमुखी पडल्याने शेतकऱ्यांचे ९३ हजारांचे नुकसान झाले आहे. तर ४३९ शेतकऱ्यांचे कुक्कुटपालनातील पक्षी मृत झाल्याने १ लाख १८ हजार ७०० रूपयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील सुमारे १०३ कुटुंबांची घरे दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधीत पुराच्या पाण्याखाली राहिल्याने त्यांचे ५ लाख १५ हजारांचे नुकसान झाले आहे. यावर्षी सर्वाधिक नुकसान हे २१ ते २३ जुलै या तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीत झाले आहे. या तीन दिवसात तब्बल १० लाख ७१ हजार ४०० रूपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, पुरामध्ये बुडून मृत्यू झालेल्या दोघांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ४ लाख याप्रमाणे एकूण ८ लाख रूपयांची मदत करण्यात आली आहे. तर ज्या कुटुंबाची घरे दोन दिवसांपेक्षा जास्त काळ पुराच्या पाण्यामध्ये होती, अशा कुटुंबांसाठी मदत म्हणून शासनाकडून ३ लाख ८५ हजार रूपये प्राप्त झाले आहेत. अशी १०३ कुटुंबे बाधित असून, त्यापैकी ७७ लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित २६ लाभार्थ्यांनाही अनुदान मंजूर असून, धनादेश अदा करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.