खेड (जि. रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यांच्या पोलादपूर बाजूकडील कायमस्वरूपी वीजपुरवठा कार्यान्वित झाला आहे. रत्नागिरी बाजूकडील वीजपुरवठा येत्या १०-१५ दिवसांतच पूर्ववत होईल. बोगद्यातील गळतीसह अंतर्गत कामे युद्धपातळीवर सुरू असून, १५ मेपूर्वी दोन्ही बोगद्यांतील वाहतूक पूर्ण क्षमतेने खुली होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.मेमध्ये सुटीच्या हंगामात गावी येणाऱ्या मुंबईकरांची संख्या लक्षणीय असते. सणांच्या कालावधीत मुंबईकरांनी बोगद्यातूनच प्रवास करण्यास सर्वाधिक पसंती दिली होती. १५ मेपूर्वी पूर्ण क्षमतेने बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्रयत्नशील आहे. येत्या १०-१५ दिवसांत बोगद्यात २४ तास वीजपुरवठा कार्यान्वित होणार आहे. ऐन उन्हाळ्यात दोन्ही बोगद्यांत लागलेली गळती थांबविण्यासाठी पुन्हा ग्राऊंटिंगचा अवलंब करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
दाेन्ही बाजूंना २०० पथदिपांची उभारणीदोन्ही बोगद्यांतील मार्गावर दोन्ही बाजूंना २०० पथदिपांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी विद्युत खांबासह आवश्यक ती यंत्रसामग्रीही उपलब्ध झाली आहे. एक-दोन दिवसांतच पथदिपांच्या उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी २० दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.