जिल्हा परिषदेतर्फे घोषवाक्य लेखन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:35 IST2021-09-12T04:35:18+5:302021-09-12T04:35:18+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत घोषवाक्य स्पर्धेचे ...

जिल्हा परिषदेतर्फे घोषवाक्य लेखन स्पर्धा
रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत घोषवाक्य स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिली.
हागणदारीमुक्तीबाबत लोकांमध्ये जाणीव, जागृती निर्माण करण्यासाठी तसेच लोकसहभाग वाढविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गाव संकल्पना राबवणे, कुटुंब, गाव, शाळा, अंगणवाडीमध्ये स्वच्छतेचे महत्त्व सांगणे, कचरा वर्गीकरण, सांडपाणी व्यवस्थापन हे यामागील उद्देश आहेत. जिल्ह्यातील सर्व गावे व ग्रामपंचयती घोषवाक्य स्पर्धेत सहभागी होणे बंधनकारक आहे.
शौचालयाचा नियमित वापर, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन, ओला, सुका कचरा व प्लास्टिक वर्गीकरण हे विषय स्पर्धेमध्ये हाताळायचे आहेत. दि. ९ ते १५ सप्टेंबर या कालावधीत संबंधित ग्रामसेवकांनी लिहिलेली घोषवाक्यांची छायाचित्रे एकत्रितपणे गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावीत. गटविकास अधिकारी घोषवाक्य लिहिलेल्या ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत उपमुख्य कार्यकारी अधिकार हे आलेल्या अहवालांची छाननी करून त्यातील १० ग्रामपंचायतींची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत. यामध्ये पहिल्या तीन ग्रामपंचायतींची निवड करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी घोषवाक्य लेखन स्पर्धेत सहभाग घेऊन ही चळवळ गतिमान करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. जाखड यांनी केले आहे.