पिंपळी बुद्रुक येथे सहा फ्लॅट फोडले
By Admin | Updated: June 15, 2014 00:35 IST2014-06-15T00:33:06+5:302014-06-15T00:35:29+5:30
आठ तोळ्याचे दागिने लंपास : महापारेषण कर्मचारी वसाहतीमधील घटना

पिंपळी बुद्रुक येथे सहा फ्लॅट फोडले
शिरगाव : चिपळूण-कऱ्हाड हमरस्त्यालगत व संपूर्ण सुरक्षेची चोख व्यवस्था असतानाही अज्ञात चोरट्यांनी पिंपळी बुद्रुक येथे काल, शुक्रवारी मध्यरात्री सहा फ्लॅट फोडले. त्यापैकी एका फ्लॅटमधून ७२ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
न्यू कोयना महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित ४०० केव्ही ग्रहण केंद्राच्या या वसाहतीमधील नंदकुमार सुतार यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरटे घरात घुसले. लोखंडी कपाट उचकटून त्यातील सुमारे ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. त्यावेळी सुतार सातारा येथील आपल्या घरी गेले होते. आज, शनिवारी सकाळी त्यांच्या मित्राने सुतार यांना दूरध्वनीवरून दरवाजा उघडला असल्याबाबत कळविल्यानंतर ते पिंपळी येथे तातडीने दाखल झाले. या घटनेनंतर तत्काळ संपूर्ण वसाहतीमध्येही पाहणी केली असता यावेळी आणखी सहा प्लॅट फोडल्याचे निदर्शनास आले. मात्र, शिरगाव पोलीस ठाण्यात केवळ सुतार यांनीच तक्रार दाखल केली आहे.
चोरीचे वृत्त समजताच येथील पोलीस उपविभागीय अधिकारी दीपाली काळे, शिरगावचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगौले, चिपळूणचे उत्तम जगदाळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. यावेळी डॉग स्कॉड आणण्याचे ठरले. मात्र, कालांतराने हा निर्णय रद्द करण्यात आल्याचे समजले. याच वसाहतीचे व कार्यालयाचे कार्यकारी अभियंता ए. एस. आडके यांनीही भेट देऊन पोलिसांना सर्व ती माहिती दिली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक चौरे अधिक तपास करीत आहेत. काल रात्री जे सुरक्षारक्षक येथे कार्यरत होते, त्यांच्याकडे पोलीस विचारपूस करीत आहेत. (वार्ताहर)