सर सलामत तो....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST2021-05-12T04:31:50+5:302021-05-12T04:31:50+5:30

एवढं सगळं होऊनही अजूनही आपल्यापैकी काहींना शहाणपण येत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. गेले सव्वा वर्षे आरोग्य यंत्रणेचा लढा ...

Sir Salamat to .... | सर सलामत तो....

सर सलामत तो....

एवढं सगळं होऊनही अजूनही आपल्यापैकी काहींना शहाणपण येत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. गेले सव्वा वर्षे आरोग्य यंत्रणेचा लढा अन्य यंत्रणांना सोबत घेऊन सुरू आहे. गेल्या वर्षीही मे महिन्यात कोरोना वाढू लागताच आपली भंबेरी उडाली होती. त्यातच भर पडली ती मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची. त्यानंतर सप्टेंबरपर्यंत जो कोरोनाचा हाहाकार सुरू झाला, त्याने अवघा जिल्हा हादरला; पण गेल्या वर्षाची कोरोनाच्या आकडेवारीचे रेकाॅर्ड केवळ एका एप्रिल महिन्याने तोडले. या महिन्यात अकरा हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले. हे पाहाता आपण लाॅकडाऊनला किती गांभीर्याने घेतले आणि घेत आहोत, याबाबतचे आत्मपरिक्षण अशा मंडळींनी जरूर करावे.

सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत दूध, भाजीपाला यांची दुकाने सुरू आहेत; मात्र लोक आता जणु काही दिवसभर तुरुंगातच रहाणार असून, उपाशी मरायला लागणार आहे, अशा बेताने अख्खे दुकान लुटून नेल्यासारखे नेत आहेत. ज्यांच्या किराणा मालाच्या दुकानात दुधाची विक्री होत आहे, अशांची चांदीच झाली आहे. अनेक दुकानदार अर्ध्यावर शटर सुरू ठेवून अन्य मालांचीही विक्री करत आहे. ज्यांच्या दुकानात दूध नाही, त्यांना घरपोच सेवेसाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचे दुकान मात्र कायमच बंद आहे. लाॅकडाऊनचा योग्य अर्थ नागरिकांना कळत नसल्याने आणि दुर्दैवाने त्याची जिथे आवश्यकता आहे तिथे योग्यरीत्या अंमलबजावणी होत नसल्यानेच सध्या लाॅकडाऊनचे तीन तेरा वाजले म्हणायची वेळ आली आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपल्या जीवाची काळजी घेण्याचा मक्ता शासन आणि त्याचे प्रशासन याची आहे. त्यामुळे आपण खड्ड्यात पडलो तरीही वाचवायला येणे, ही जबाबदारीही त्यांचीही आहे, हे आपल्या डोक्यात एकदम फिट्ट बसलेले असल्याने आपण प्रत्येक गोष्टीत बेफिकिरी दाखवत असतो. परिणामी, कधी तरी अशा बेफिकिरीचा जोरदार फटका असा बसतो की मग सारे होत्याचे नव्हते होऊन जाते. मृत्यू किती स्वस्त झालाय, हे कोरोनाने दाखवून दिले आहे. म्हणूनच आता तरी यातून थोडं शहाणं होऊया. या संकटातून सावरण्यासाठी केवळ आरोग्य यंत्रणा किंवा प्रशासन पुरेसे नाही, तर आपणही बराचसा हातभार लावण्याची गरज आहे. एक म्हण आहे - सर सलामत तो पगडी पचास. सध्या या म्हणीप्रमाणे प्रत्येकानेच आपली पगडी, अर्थात आपला आणि दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी योग्य ती खबरदारी घेऊया.

Web Title: Sir Salamat to ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.