चिमुकल्यांना एकच लस
By Admin | Updated: November 5, 2015 00:10 IST2015-11-04T22:00:55+5:302015-11-05T00:10:50+5:30
आरोग्य विभाग : पाच प्रकारच्या आजारांवर उपाय

चिमुकल्यांना एकच लस
रत्नागिरी : बालवयात होणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण ही सर्वात प्रभावी पद्धत ठरली आहे. मात्र आता यावर उपाय म्हणून ‘पेंटावॅलेंट’ नावाची लस उपलब्ध झाली असून चार लसींऐवजी ही एकच लस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पालकांचे श्रम आता वाचणार आहेत.सध्या शासनाने नवीन लस निर्माण केली असून, यापूर्वी लहान वयात होणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी चार वेगवेगळ्या प्रकारची लस देण्यात येत होती. परंतु, सध्या ५ रोगांवर मात करणारी एकच नवीन लस ‘पेंटावॅलेंट’ नावाने उपलब्ध झाली आहे. ही लस १४ नोव्हेंबरनंतर राज्यामध्ये प्रत्येक बालकास दिली जाणार आहे. या पेंटावॅलेंट लसीमध्ये घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपिटायटीस - बी आणि हिमोफिलस इन्प्ल्युएन्झा टाईप - बी या ५ आजारांचा प्रतिबंध करणाऱ्या लसींचा समावेश करण्यात आला आहे. ही लस सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत मिळणार आहे. खासगी रुग्णालयात घ्यावयाची झाल्यास ही लस अंदाजे १२०० रुपयांत उपलब्ध होणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
जिल्ह््यातील जवळपास ९० हजार बालकांना या लसीचा लाभ मिळणार आहे. आत्तापर्यंत घटसर्प, डांग्या खोकला, हेपिटायटीस - बी अशा चार लसींचा समावेश असलेली दोन प्रकारची इंजेक्शन एकावेळी दिली जात होती.
बालकाच्या जन्माच्या पहिल्या दीड महिन्यात एक, अडीच महिने आणि नंतर साडेतीन महिन्याच्या कालावधीत अशी प्रत्येकी दोन इंजेक्शन देण्यात येत होती. त्यामुळे एक वर्षाच्या आतील बालकाला हे डोस देण्यासाठी सहावेळा इंजेक्शनची सुई टोचावी लागत होती. परंतु, नवीन लस निर्मितीमुळे वारंवार सुई टोचावी लागणार नाही.
लसीकरण वापराबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
पेंटावॅलेंट : यापूर्वी होत्या चार लसी
लस १४ नोव्हेंबरनंतर बालकास दिली जाणार.
पेंटावॅलेंट लसीमध्ये घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपिटायटीस - बी आणि हिमोफिलस इन्प्ल्युएन्झा टाईप - बी या ५ आजारांचा प्रतिबंध करणाऱ्या लसींचा समावेश.
लाभ घ्यावा
जनतेने ही नवीन लस उपलब्ध होताच त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य सभापती, जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.