रत्नागिरी : सध्या काम करणारा उपाशी तर बेईमानी मालामाल बनला आहे. कोकणातील स्थानिक प्रश्नाकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आपले प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी रस्त्यावर उतरून लढले पाहिजे. कोकणातील प्रश्नांसाठी मी फेब्रुवारीपर्यंत वेळ देतो, अन्यथा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्ग ते मुंबई अशी पदयात्रा काढून येथील प्रश्नासाठी थेट लढणार असल्याचा इशारा प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला.प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे राज्यभर सुरू असलेल्या हक्कयात्रेची सांगता सोमवारी (दि. १३) रत्नागिरीत झाली. स्वा. सावरकर नाट्यगृह येथे आयोजित दिव्यांग, शेतकरी, मच्छिमार, आंबा बागायतदारांचा मेळावा यानिमित्ताने आयोजित केला होता. त्यावेळी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला हा इशारा दिला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार बाळ माने, प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या ठाणे महिला जिल्हाध्यक्ष काजल नाईक, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, प्रकाश साळवी, सुरेश भायजे, अशोक जाधव, हितेश जाधव, महेश भडे उपस्थित होते.राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जाती, पाती, धर्माच्या बेड्यात जनतेला अडकवून ठेवले आहे. आपण आपापसात भांडत राहिलो तर या सरकारकडे आपल्या न्याय हक्कासाठी भांडणार कोण? आतापर्यंत ३५० गुन्हे स्वत:वर दाखल करून लढत आहे. दिव्यांगासाठी शासनाकडून दरमहा सहा हजार रुपये पेन्शनची मागणी असून, ती पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे कडू यांनी ठणकावून सांगितले.प्रास्ताविक प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी केले. यावेळी विविध दिव्यांग संस्थांच्या हस्ते बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला. माजी आमदार बाळ माने यांनी मार्गदर्शन करताना, विकासाच्या नावाखाली जिल्हा भकास करण्याचे काम सुरू आहे. पालकमंत्र्यांनी दिव्यांगांसाठी काही केलेले नाही. त्यांच्या हक्काचा निधीही दिलेला नसल्याची खंत व्यक्त केली. सूत्रसंचलन उदय कांबळे तर आभार प्रदर्शन काजल नाईक यांनी केले.
Web Summary : Bachchu Kadu threatens a Sindhudurg to Mumbai march in February if Konkan's issues aren't addressed. He demands pension for disabled and criticizes government neglect.
Web Summary : बच्चू कडू ने कोंकण के मुद्दों का समाधान न होने पर फरवरी में सिंधुदुर्ग से मुंबई तक मार्च की धमकी दी। उन्होंने विकलांगों के लिए पेंशन की मांग की और सरकार की उपेक्षा की आलोचना की।