अबब, बेनगी गावात एकाचवेळी आढळले ३० पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST2021-05-11T04:33:21+5:302021-05-11T04:33:21+5:30
राजापूर : ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत घरोघरी जाऊन सुरू करण्यात आलेल्या कुटुंबाच्या सर्वेक्षणात तालुक्यातील बेनगी गावात ...

अबब, बेनगी गावात एकाचवेळी आढळले ३० पाॅझिटिव्ह
राजापूर : ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत घरोघरी जाऊन सुरू करण्यात आलेल्या कुटुंबाच्या सर्वेक्षणात तालुक्यातील बेनगी गावात एकाच वेळी कोरोनाचे तीस पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या अभियानांतर्गत झालेल्या सर्वेक्षणात तालुक्यातील २९,३६२ कुटुंबांची तपासणी झाली असून, त्यामध्ये ४३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असल्याची माहिती येथील आरोग्य यंत्रणेने दिली.
तालुक्यातील बेनगी गावात सर्दी-तापाचे संशयित रुग्ण वाढत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून धारतळे ग्रामीण रुग्णालयातर्फे आरोग्यची टिम त्या गावात दाखल झाली़. त्यानंतर सर्दी - तापाने आजारी असलेल्या रुग्णांची ॲंटिजन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तीस पॉझिटिव्ह रुग्ण सापडले़. दरम्यान, या रुग्णांच्या संपर्कात कोण - कोण आले होते त्यांचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे.
शासनातर्फे माझी रत्नागिरी माझी जबाबदारी हे अभियान राबविले जात आहे. यामध्ये प्रत्येक घरी जाऊन तेथील कुटुंबातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन पातळी आदींची तपासणी प्रामुख्याने होत आहे़
तालुक्यातील बेनगी येथे सर्दी-तापाचे अनेक संशयित रुग्ण असल्याची माहिती राजापूर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाला मिळाली होती़. त्यानुसार येथील प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़. निखिल परांजपे यांनी धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका पथकाच्या सहाय्याने बेनगी येथे जाऊन त्या सर्व रुग्णांची ॲंटिजन तपासणी केली़ तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढत असल्याने नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये, नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे़