मुलींच्या सामूहिक विवाहासाठी ‘शुभमंगल’
By Admin | Updated: June 1, 2014 00:47 IST2014-06-01T00:46:57+5:302014-06-01T00:47:09+5:30
महिला व बालविकास : शेतकरी, शेतमजुरांच्या कुटुंबीयांना दिलासा

मुलींच्या सामूहिक विवाहासाठी ‘शुभमंगल’
रत्नागिरी : महिला व बाल विकास विभागातर्फे जिल्ह्यातील शेतकर्यांच्या, शेतमजुरांच्या मुलीच्या सामुहिक विवाहासाठी शासनातर्फे ‘शुभमंगल सामुहिक विवाह योजना’ राबविण्यात येत आहे. ही योजना नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेतर्फे राबविण्यात येईल. स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे दोन हजार रूपये प्रोत्साहनात्मक अनुदान शासनातर्फे देण्यात येईल. या अनुदानातून विवाहाचे आयोजन, विवाह समारंभाचा खर्च, विवाह नोंदणी शुल्क यावर होणारा खर्च स्वयंसेवी संस्थेतर्फे करण्यात येईल. या योजनेंतर्गत मुलींच्या विवाहासाठी आवश्यक मंगळसूत्र व इतर वस्तुंची खरेदी करण्यासाठी प्रति जोडपे १० हजार रूपये अनुदान शासनातर्फे देण्यात येते. शासनाने सुधारित शुभमंगल सामुहिक, नोंदणीकृत विवाह योजनाही कार्यान्वित केली असून या सुधारित शुभमंगल सामुहिक, नोंदणीकृत योजनेंतर्गत जे जोडपे सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणीकृत विवाह करतील, त्यांना १० हजार रूपये अनुदान देण्यात येते. ही योजना फक्त शेतकरी, शेतमजूर यांच्या पाल्यासाठी न ठेवता निराधार, परित्यक्ता आणि विधवा महिलांच्या केवळ दोन मुलींच्या विवाहाकरिता लागू केली आहे. शेतकरी व श्रमजीवींसाठी ही योजना वरदान ठरणार आहे. शेतमजुराच्या मुलींना अशा विवाहासाठी प्रोत्साहन देण्याचा ज्या संस्था प्रयत्न करतील त्यांना मदत करण्यात येणार आहे. ही योजना फक्त खुला व इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तीसाठी लागू असून अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटकी जमाती, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील दांपत्ये पात्र रहाणार नाही. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राशेजारी , जेलरोड येथे ०२३५२-२२०४६१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)