श्रीमंत भूषणसिंगराजे होळकर ५ रोजी खेडमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST2021-09-02T05:07:40+5:302021-09-02T05:07:40+5:30
खेड : तालुक्यातील धनगरवाड्यांमधील समस्या जाणून घेण्यासाठी धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे तेरावे वंशज ...

श्रीमंत भूषणसिंगराजे होळकर ५ रोजी खेडमध्ये
खेड : तालुक्यातील धनगरवाड्यांमधील समस्या जाणून घेण्यासाठी धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे तेरावे वंशज श्रीमंत भूषणसिंगराजे होळकर रविवार दिनांक ५ रोजी खेडमध्ये येत आहेत, अशी माहिती महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी दिली.
याबाबत माहिती देताना आखाडे पुढे म्हणाले की, सह्याद्री पर्वताच्या दुर्गम भागात वसलेल्या धनगरवाड्या विकासाच्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. दिनांक २१ व २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत अनेक धनगरवाड्यांवर दरडी कोसळून धनगर बांधवांच्या घरांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक धनगर बांधव बेघर झाले आहेत. तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या धनगर समाज बांधवांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने श्रीमंत भूषणसिंगराजे होळकर रविवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी खेड तालुक्यात येत आहेत.
या दौऱ्यात ते लोटे-गुणदे तलारीवाडी, मिर्ले - धनगरवाडी, खोपी-अवकिरेवाडी, खोपी - रामजीवाडी, आंबवली - बाऊलवाडी, सणघर - धनगरवाडी, वाडीबीड - धनगरवाडी येथे भेटी देऊन समाजबांधवांशी संवाद साधणार आहेत. त्याच्या दौऱ्याचे नियोजन महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचातर्फे करण्यात आल्याचेही आखाडे यांनी सांगितले.