रत्नागिरी : इटलीमध्ये तब्बल साडेतीन लाख लोक राहणाऱ्या भागातील जलस्रोत बाधित केल्यामुळे बंद करण्यात आलेल्या मिटेनी कंपनीची उपकरणे आणि कायमचे रसायन (फॉरएव्हर केमिकल) बनवण्याची प्रक्रिया आता लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपनीकडे आहे. पर्यावरणीयदृष्ट्या आणि त्यामुळे मानवी आरोग्यासाठी ही रसायने घातक असल्याने प्रदूषणाचे मोठे संकट भविष्यात लोटे आणि परिसरावर येण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, भारतीय पर्यावरण यंत्रणा याकडे अजूनही दुर्लक्ष करत आहेत.
औद्योगिक वसाहतीमधील विशेषत: रासायनिक प्रकल्प असलेल्या औद्योगिक वसाहतींमधील प्रदूषण ही गेल्या काही वर्षांतील गंभीर समस्या झाली आहे. लाेटे औद्योगिक वसाहतीत गेल्या काही वर्षांत झालेले स्फोट आणि त्यात मृत आणि जखमी झालेले कामगार हा चिंतेचा विषय आहेच. मात्र, त्याहीपेक्षा परिसरातील जलप्रदूषण, हवेतील प्रदूषण आणि मानवी आरोग्यावर होणारे परिणाम याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. दुर्दैवाने याबाबत सातत्याने लक्ष देणारी, अभ्यास करणारी कोणतीही यंत्रणा नाही.
लोटे येथे गेल्या तीन-चार वर्षांत सुरू झालेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने इटलीतील ज्या कंपनीकडून उपकरणे घेतली आहेत, ती मिटेनी कंपनी इटलीतील विसेन्झा या शहरात होती. प्रदूषणाच्या कारणामुळे ती कंपनी बंद करण्यात आली आहे. २०१८ मध्येच ही कंपनी बंद झाली. त्या कंपनीच्या संचालकांवर खटला दाखल झाला. जूनमध्ये विसेन्झीच्या न्यायालयाने पर्यावरण प्रदूषण आणि इतर कारणांसाठी या कंपनीच्या संचालकांना आणि अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. या कंपनीची सर्व उपकरणे आणि त्यातील प्रक्रिया भारतातील लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपनीची उपकंपनी असलेल्या व्हिवा लाइफ सायन्सेसने लिलावात खरेदी केली आहे. लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने नुकतेच कायमचे रसायन बनवण्याचे उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात इटलीप्रमाणेच लोटे आणि परिसरातील अनेक गावांना जल प्रदूषणाचा धोका आहे.सांडपाण्यात रसायन
इटलीतील मिटेनी कंपनीच्या सांडपाण्यामध्ये कायमचे रसायन (पीएफएएस) मोठ्या प्रमाणात आढळले. या रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे जलस्रोत मोठ्या प्रमाणात दूषित झाले. हे पाणी पिणाऱ्या लोकांच्या रक्तात कायमचे रसायन मिसळले आणि त्यामुळे त्यांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. यात मिटेनी कंपनीच्या कामगारांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला.
कायमचे रसायन म्हणजे काय?
पीएफएएस म्हणजे प्रति आणि पॉलिफ्लोरोआल्काइल पदार्थांचा मानवनिर्मित रसायनांचा मोठा गट. १९४० पासून विविध उत्पादने आणि औद्योगिक क्षेत्रात त्याचा वापर सुरू झाला. त्याला कायमचे रसायन असे म्हणतात, कारण ही रसायने सहजपणे विघटित होत नाहीत. त्यांचे अस्तित्व बराच काळ राहते. वातावरण आणि मानवी शरीरात ते खूप काळ विघटित न होता राहते आणि त्यामुळेच ते आरोग्यासाठी हानिकारक आहे.
काय होतात आरोग्यावरील परिणाम
कायमचे रसायन हवेत आणि मानवी शरीरात दीर्घकाळ टिकून राहात असल्याने मूत्रपिंड व वृषण कर्करोगाचा धोका वाढतो. अशा रसायनांमुळे हार्मोनल समतोल बिघडून थायरॉईड, प्रजनन समस्या आणि मुलांची वाढ यावर परिणाम होऊ शकतो. यकृताच्या कार्यपद्धतीवर परिणाम होतो. कोलेस्ट्राॅल आणि रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो. अशी रसायने रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करत असल्याने संसर्गाचाही धोका वाढतो.
धोका आता उशाशी
जल आणि अन्य प्रदूषणांचा धोका असलेली ही रसायने बनवण्याचा कारखाना आता लोटे येथे कार्यरत झाला आहे. भविष्यात तो या परिसरासाठी धोकादायक ठरू शकतो. इटलीमधील उदाहरण समोर असतानाही भारतीय पर्यावरण विभागाकडून अशा उत्पादनांबाबत गांभीर्य दाखवले जात नसल्याची टीका पर्यावरण तज्ज्ञांकडून अनेकदा केली जाते. मात्र, त्यानंतरही अशी उत्पादने घेण्यासाठी परवानगी दिली जाते. त्यामुळे इटलीतील धोका आता उशाशी आला आहे.
Web Summary : A factory banned in Italy for water pollution is now operating in Ratnagiri's Lote, raising concerns about environmental and health hazards. The Lakshmi Organic company acquired equipment from the closed Italian firm, Mitene, known for producing harmful 'forever chemicals,' sparking fears of water contamination similar to Italy.
Web Summary : इटली में जल प्रदूषण के लिए प्रतिबंधित एक फैक्ट्री अब रत्नागिरी के लोटे में चल रही है, जिससे पर्यावरणीय और स्वास्थ्य संबंधी खतरे बढ़ रहे हैं। लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनी ने बंद इतालवी फर्म मिटेने से उपकरण खरीदे, जो हानिकारक 'फॉरएवर केमिकल्स' का उत्पादन करने के लिए जानी जाती है, जिससे इटली के समान जल संदूषण का डर है।