धक्कादायक पराभव
By Admin | Updated: May 17, 2014 00:08 IST2014-05-17T00:08:13+5:302014-05-17T00:08:35+5:30
रत्नागिरी : सर्वसामान्य माणसाच्या मनातील नाराजीचा किंबहुना राणेंविरोधी भावनेचा उद्रेक मतदानातून झाला आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग

धक्कादायक पराभव
रत्नागिरी : सर्वसामान्य माणसाच्या मनातील नाराजीचा किंबहुना राणेंविरोधी भावनेचा उद्रेक मतदानातून झाला आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे विद्यमान खासदार आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे यांचा तब्बल दीड लाख मतांनी धक्कादायक पराभव झाल्याने मतदारसंघात खळबळ उडाली असून, नारायण राणे यांच्या वर्चस्वाला जबर धक्का बसला आहे. महायुतीचे उमेदवार विनायक राऊत या मतदारसंघाचे सोळावे खासदार म्हणून विजयी झाले आहेत. या विजयाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज दुपारी रत्नागिरीत येऊन रत्नागिरीकरांना अभिवादन करतानाच विजयी उमेदवार विनायक राऊत यांचे अभिनंदन केले. २००९ मध्ये खासदार बनलेले कॉँग्रेसचे नीलेश राणे यांचा यावेळचा पराभव उद्योगमंत्री राणे यांच्या जिव्हारी लागला. त्यांचेच होमपीच असलेल्या सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात नीलेश राणे यांची पीछेहाट झाली. सावंतवाडी व कुडाळ विधानसभा मतदारसंघात विनायक राऊत यांना विक्रमी मताधिक्य मिळाले. कणकवलीत राऊत यांना अल्प मताधिक्यावर समाधान मानावे लागले. सावंतवाडी मतदारसंघात राष्टÑवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी राणे यांच्याविरोधात केलेल्या बंडाचे पडसाद मतदान यंत्रातून प्रकर्षाने दिसून आले. त्या मतदारसंघात सेनेच्या विनायक राऊत यांना तब्बल ४१ हजारांचे मताधिक्य मिळाले, तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे वर्चस्व असतानाही तेथे सेनेच्या राऊत यांना ३७ हजारांचे मताधिक्य मिळाले. राजापूरमध्ये २२ हजार मताधिक्य राऊत यांना मिळाले. केवळ कणकवली मतदारसंघात राऊत यांना १३७७ एवढे अल्प मताधिक्य मिळाले. संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील कॉँग्रेसच्या झालेल्या पीछेहाटीने पक्ष कार्यकर्त्यांनाही धक्का बसला आहे. नीलेश राणे व राज्यातील कॉँग्रेस उमेदवारांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपला मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या विधानसभा मतदार संघांसह कणकवली आणि कुडाळ या नारायण राणे यांच्या प्रभावक्षेत्रातही नीलेश राणे यांची मोठी पीछेहाट झाली आहे. त्यामुळे या पराभवाची कारणमिमांसा आता राणे कुुटुंबियांना व कॉँग्रेसलाही करावी लागणार आहे. रत्नागिरी एमआयडीसीतील फूूड कॉर्पोरेशनच्या इमारतीत सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच सेनेचे विनायक राऊत यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती. मताधिक्याचा ग्राफ उंचावत गेला तो दीड लाखांपर्यंत पोहोचला. प्रत्येक फेरीत राऊत यांना मिळालेले मताधिक्य याप्रमाणे : १-५९१९, २-७७८५, ३-५३९३, ४-५०९३, ५-९७००, ६-९०८४, ७-७४६३, ८-७०३८, ९-३७६७, १०-५४०४, ११-९९५९, १२-७१९४, १३-७८२३, १४-४०४५, १५-८८३८, १६-७१९१, १७-६७५७, १८-५२४१, १९-४४८६, २०-७६७२, २१-५३५६, २२-३७७१, २३-२६९७, २४-१८०२, २५-६२२. पहिल्या चार ते पाच फेर्यांतच निवडणूक निकालाचा कल स्पष्ट दिसून येत होता. पाचव्या फेरीत राऊत यांनी ९७०० मताधिक्य मिळविल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केला. कारण पुढील सर्वच फेर्यात राऊत यांना मताधिक्य मिळत असल्याचे वृत्तही तोपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले होते. सकाळी ८.१५ वाजताच्या दरम्यान उमेदवार नीलेश राणे मतमोजणी केंद्रात येऊन काही वेळातच निघून गेले. मात्र, महायुतीचे कार्यकर्ते विजयाचा अंदाज येताच मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करू लागले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य राऊतना मिळाले नंतर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. (प्रतिनिधी)