राजापुरात युतीसाठी शिवसेनेचा हात पुढे

By Admin | Updated: July 18, 2016 00:02 IST2016-07-18T00:02:03+5:302016-07-18T00:02:10+5:30

नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक

Shiv Sena's hand in Rajapurhat's hand | राजापुरात युतीसाठी शिवसेनेचा हात पुढे

राजापुरात युतीसाठी शिवसेनेचा हात पुढे

राजापूर : नगरपरिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना सक्रिय झाली आहे. शनिवारी नेतेमंडळी, पदाधिकारी आणि शहरातील शिवसैनिकांसोबत झालेल्या बैठकीनंतर आमदार राजन साळवी यांनी युती करण्यासाठी भाजपकडे हात पुढे केल्याची घोषणा केली आहे.
शनिवारी झालेल्या सेनेच्या बैठकीला माजी आमदार गणपत कदम, नगरपरिषदेतील सेना-भाजपचे विद्यमान गटनेते अभय मेळेकर, शिवसेना शहरप्रमुख अनिल कुडाळी, विद्यमान नगरसेवक, शिवसैनिक तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर बोलताना आमदार साळवी यांनी सांगितले की, राजापूर नगर परिषदेत सेना-भाजप युतीचा रिवाज अनेक वर्षे चालत आलेला आहे. नगर परिषदेच्या राजकारणात हे दोन्ही मित्रपक्ष आजपर्यंत एकोप्याने काम करीत आले आहेत. राजापूर शहराच्या राजकारणाला वेगळी किनार आहे. यापूर्वी सत्तेच्या काळात शहराच्या सर्वांगिण विकासाला मिळालेली चालना आता राज्यात उभय पक्ष सत्तेत असल्याने अधिक जोमाने मिळणार आहे. त्यामुळे आगामी पंचवार्षिक निवडणूकदेखील युतीद्वारे लढवण्याचा शिवसेनेचा मानस आहे. युती झाल्यास मतविभागणीचा तोटा रोखला जाऊन सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना त्याचा फायदा मिळणार आहे. याकरिता युती व्हावी, अशी आपली मनोमन इच्छा असून, त्यासाठी आपण मैत्रीपूर्ण हात पुढे करीत आहोत, असे साळवी यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेने प्रथमच संभाव्य युतीबाबत जाहीर भूमिका व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार साळवी यांनी सेना-भाजप युतीसाठी भूमिका घेतली आहे. स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची वारंवार घोषणा करणाऱ्या भाजपकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shiv Sena's hand in Rajapurhat's hand