ग्रामीण भागात शिवसेनाच अव्वल

By Admin | Updated: October 20, 2014 22:30 IST2014-10-20T22:09:00+5:302014-10-20T22:30:18+5:30

मजबूत पकड : पूर्ण यश नसले तरी बालेकिल्ल्याची सुभेदारी कायम

Shiv Sena tops in rural areas | ग्रामीण भागात शिवसेनाच अव्वल

ग्रामीण भागात शिवसेनाच अव्वल

रत्नागिरी : जिल्ह्यात तळागाळापर्यंत पोहोचलेले, सर्वसामान्यांशी कायम संपर्कात राहणारे कार्यकर्ते फक्त शिवसेनेकडे असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीतून स्पष्ट झाले. जिल्ह्यातील ७ लाख ९६ हजार ९५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ३ लाख २६ हजार ८७२ मते म्हणजेच ४१.0१ टक्के इतकी मते एकट्या शिवसेनेला मिळाली आहेत. रत्नागिरी मतदार संघात शिवसेनेला मिळालेली १00 टक्के मते शिवसेनेची नसली तरी त्यातील खूप मोठा वाटा शिवसेनेचा आहे. त्यामुळे तळागाळात आजही शिवसेनेची बीजे घट्ट असल्याचे स्पष्ट होत आहे.
रविवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. पाचपैकी तीन विधानसभा मतदार संघांमध्ये शिवसेनेने भगवा फडकवला. गतवेळी शिवसेनेकडे असलेला दापोली विधानसभा मतदार संघ यावेळी राष्ट्रवादीकडे गेला असला तरी गेल्या वेळी राष्ट्रवादीकडे असलेला रत्नागिरी मतदारसंघ यावेळी शिवसेनेकडे आला आहे. त्यामुळे विधानसभेतील रत्नागिरीचा वाटा कायम ठेवण्यात शिवसेनेला यश आले आहे.
जिल्ह्यात मिळालेल्या सव्वातीन लाख मतांचा विचार केला, तर सर्वाधिक ९३ हजार ८७६ मते शिवसेनेला रत्नागिरीत मिळाली आहेत. अर्थात ही सर्वच्या सर्व मते शिवसेनेची नाहीत. ज्या काही ‘अर्थ’पूर्ण तडजोडी झाल्या त्यात राष्ट्रवादी आणि भाजपची मतेही शिवसेनेला मिळाली. पण, शिवसेना रत्नागिरी तालुक्यात आधीपासूनच मजबूत आहे, हे नक्की. काही ‘मोला’ची वाढीव मते वगळली, तरी शिवसेनेचा मतांमधील वाटा खूप मोठा आहे. त्याखालोखाल शिवसेनेला अधिक मते मिळाली ती राजापूर मतदार संघात. येथे राजन साळवी यांनी ७६ हजार २६६ मते मिळवली. ही सर्वच मते ही पूर्णपणे शिवसेनेचीच आहेत.
शिवसेनेचा तिसरा आमदार निवडून आलेल्या चिपळूण मतदार संघात शिवसेनेच्या मतांची संख्या आहे. ती आहे ७५ हजार ६९५. गतनिवडणुकीत युती असताना शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांना ७६,0१५ मते मिळाली होती. याच मतदार संघातील भाजप उमेदवाराला ९,१४३ मते मिळाल्यामुळे चव्हाण यांची थोडी मते कमी झाली आहेत. पण, जी मते त्यांना मिळाली आहेत, ती पूर्णपणे शिवसेनेची आहेत.
दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेनेला पराभव पत्करावा लागला. पण, तेथेही शिवसेनेची ताकद मोठीच आहे. सूर्यकांत दळवी यांना ३ हजार २६४ मतांनी पराभूत व्हावे लागले. गत निवडणुकीत त्यांनी ४६ हजारांचे मताधिक्य मिळवले होते. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अनंत गीते यांना या मतदार संघात १७ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. येथील सूर्यकांत दळवी यांच्याबाबत असलेल्या नाराजीमुळे शिवसेनेची मते इतरत्र वळली. रत्नागिरील पक्षांतरामुळे जी समीकरणे बदलली, त्यात जिल्हा पषिदेचे सभापती आयत्यावेळी बदलले गेले. त्यामुळे काहीजण सूर्यकांत दळवी यांच्यापासून लांब गेले. त्याचा त्रास दळवी यांना सहन करावा लागला. पण, शिवसेना या मतदार संघातही मजबूत असल्याचे स्पष्ट झाले.
शिवसेना कमी झाली आहे ती गुहागर मतदारसंघात. अनंत गीते आणि रामदास कदम यांच्यातील गटातटाच्या राजकारणामुळे गुहागरमध्ये शिवसेना थोडी बॅकफूटवर आली आहे. २00९च्या निवडणुकीत शिवसेनेच्या रामदास कदम यांना ४0 हजार ३२ मते मिळाली होती. मात्र, यावेळी ती मते ३२ हजार ८३ वर आली आहेत. ही मते भाजपकडे वळली असण्याची अधिक शक्यता आहे.
शिवसेनेची ही मते लक्षात घेता कसलीही फाटाफूट झाली नाही, तर सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर पुन्हा एकदा कब्जा करण्याची ताकद शिवसेनेकडेच आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shiv Sena tops in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.