रिफायनरीबाबत शिवसेनेने सोक्षमोक्ष लावावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:35 IST2021-09-23T04:35:07+5:302021-09-23T04:35:07+5:30

राजापूर : तब्बल साडेआठ हजार एकर जमीनमालकांची संमतीपत्रे असतानाही दबावाचा वापर करून नाणारमधील रिफायनरी प्रकल्प रद्द करून दाखविण्याची मर्दुमकी ...

Shiv Sena should make a statement about the refinery | रिफायनरीबाबत शिवसेनेने सोक्षमोक्ष लावावा

रिफायनरीबाबत शिवसेनेने सोक्षमोक्ष लावावा

राजापूर : तब्बल साडेआठ हजार एकर जमीनमालकांची संमतीपत्रे असतानाही दबावाचा वापर करून नाणारमधील रिफायनरी प्रकल्प रद्द करून दाखविण्याची मर्दुमकी गाजविलेल्या शिवसेनेने आता बारसू-सोलगांवमध्येही तोच फंडा वापरला आहे. खासदार विनायक राऊत यांच्याकडे प्रकल्पसमर्थकांनी मोठ्या समर्थनाची पत्रे देऊनही या भागातही विरोध वाढविण्यासाठी हेच लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे खासदार राऊत यांचीच भूमिका ही शिवसेनेची भूमिका असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी राजापूर तालुक्यातून केली जात आहे.

रिफायनरी प्रकल्पासाठी नाणार असो अथवा पर्याय म्हणून पुढे आलेली बारसू-सोलगांवची जागा असो प्रकल्पाला विरोध करण्यासाठी प्रत्येकवेळी ठरावीकच नेतृत्व पुढे आले आहे. यामध्ये मुंबईकरांचा मोठा सहभाग आहे. आम्हाला काहीही ऐकायचेच नाही अशी भूमिका या मंडळींनी घेतली आहे. गेली अनेक दशके तालुक्यात ठरावीक समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांना चाकरमान्यांकडून वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून मौन पाळण्यास भाग पाडले जात आहे.

शिवसेनेने या प्रस्तावित प्रकल्पाला विरोध करण्यासाठी छुपे राजकारण अंगीकारलेले दिसत आहे. प्रचंड समर्थन असतानाही नाणार प्रकल्पाबाबत राऊत यांनी तेथील समर्थकांना अखेरपर्यंत भेटच दिली नाही. बारसू-सोलगांवमध्ये मोठ्या मुश्किलीने एकदा भेट दिल्यानंतर लागलीच प्रकल्प विरोधकांना तुम्ही विरोध वाढवा असा जाहीर सल्लाही त्यांनी दिला होता. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. प्रकल्पसमर्थकांनी बारसू-सोलगांवसाठी खासदार राऊत यांची भेट घेतल्यानंतर महिना उलटत आला तरी अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत निर्णयच होत नसल्याने राजापूरकर जनता जे समजायचे ते समजून चुकली असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

या प्रकल्पासाठी नगरपरिषदेसह राजापूर तालुक्यातील १२० गावांनी समर्थन दिलेले आहे. राजापुरातील ५५, तर रत्नागिरीतील २५ संघटनांनी कोकणच्या विकासासाठी प्रकल्प व्हावा, अशी जाहीर भूमिका घेतली आहे. त्यांची पत्रे मुख्यमंत्री, तसेच उद्योगमंत्र्यांना देण्यात आलेली आहेत. मात्र, केंद्रात मतदारसंघाचे नेतृत्व करणारे खासदार राऊत हे ज्या भागात प्रकल्प होणार आहे, त्या पाच गावांतील बहुमत शिवसेना आजमावणार असल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे खासदार राऊत यांचे निकटवर्तीय बारसू-सोलगांवमध्ये विरोध वाढण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत असताना दिसत आहेत. यामुळे शिवसेनेविरोधात तालुक्यात मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

..........................

देशाच्या सर्वोच्च सभागृहात आमच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार राऊत यांचे वडापाव पुराण मतदारसंघाने ऐकले आहे. त्यांना तीन लाख कोटींचा प्रकल्प, बेरोजगारी निर्मूलन, जीडीपी अशा बाबी अनाकलनीय आहेत. मतदारसंघाची चेष्टा होणारे खासदार लाभणे हे आपले सर्वांचेच दुर्दैव आहे. शिवसेनेकडे राज्याच्या सत्तेचा ताम्रपट नाही. आम्ही थोडी वाट पाहू; मात्र प्रकल्प हा होणारच आहे.

- रवींद्र नागरेकर, उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा भाजपा

............................

राजापूर तालुक्यात प्रकल्पाला समर्थन करणारे प्रमुख चार राजकीय पक्ष, तालुक्यातील १२० गावे, ५५ संघटना, राजापूर नगर परिषद आणि रत्नागिरीतील बहुतांशी संघटना ह्या एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला जातीपातीच्या राजकारणाचा आधार घेऊन तालुक्याला आव्हान देणारे एनजीओ आणि काही प्रकल्पविरोधक दलाल अशी स्थिती आहे. शिवसेनेने योग्य भूमिका घ्यावी अशी अपेक्षा आहे. प्रकल्प गेलाच तर त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसू शकतो याचे भान ठेवावे

- ॲड. शशिकांत सुतार, अध्यक्ष, रिफायनरी प्रकल्प समन्वय समिती

..........................

तीन लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा केंद्र शासनाचा देशातील सर्वोच्च प्रकल्प होणार की नाही हे ५६ आमदार असलेला एक प्रादेशिक पक्ष ठरविणार ही बाबच हास्यास्पद आहे. खासदार राऊत यांचे पाच गावांतील बहुमत देशाचा सर्वोच्च प्रकल्पाचे भवितव्य ठरविणार हे वक्तव्य ऐकल्यानंतर शिवसेनेसारख्या पक्षाकडून देश, देशहित या बाबी अपेक्षित धरणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. मात्र, सत्तेपुढे शहाणपण नाही हेच खरे.

- विनायक कदम, प्रकल्पबाधित, बारसू.

Web Title: Shiv Sena should make a statement about the refinery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.