शिवसेना पदाधिकारी पालिकेवर धडकले

By Admin | Updated: November 24, 2015 00:29 IST2015-11-23T23:32:11+5:302015-11-24T00:29:43+5:30

विविध घोषणाबाजी : इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे काम सुरु करा अन्यथा...

Shiv Sena office bearers | शिवसेना पदाधिकारी पालिकेवर धडकले

शिवसेना पदाधिकारी पालिकेवर धडकले

चिपळूण : विकासकामात राजकारण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो, सांस्कृतिक केंद्राचे काम चालू करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, सांस्कृतिक केंद्राचे काम सुरू करा, अशा घोषणा देत शिवसेनेचे उपशहर प्रमुख उमेश सकपाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या केबिनमध्ये आज सोमवारी सकाळी ११ वाजता धडक दिली.
शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे काम गेले अनेक महिने संथ गतीने सुरु आहे. ठेकेदाराला बिल अदा झाले नसल्याने काम थांबवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत सांस्कृतिक केंद्राचे काम वेगात सुरू व्हावे व चिपळूणकरांना त्याचा आस्वाद घेता यावा, यासाठी उपशहरप्रमुख सकपाळ, नगरसेविका सुरेखा खेराडे, नाट्य संयोजक श्रीराम कुष्टे, नगरसेवक इनायत मुकादम, विभागप्रमुख बाळ परांजपे, मनोज शिंदे, विकी लवेकर यांच्यासह सेनेचे अनेक पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस उपनिरीक्षक राकेश सिंग परदेशी हजर होते. मोर्चेकऱ्यांनी मुख्याधिकारी पाटील यांची केबिन गाठली. सांस्कृतिक केंद्राचे काम का थांबले? लवकरच सांस्कृतिक केंद्र सुरु करावे. येथील नागरिकांना सांस्कृतिक केंद्राबाबत उत्सुकता आहे. याबाबत आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही, असे सकपाळ यांनी शांतपणे सांगितले. मुख्याधिकारी डॉ. पाटील यांनी सकपाळ यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आपण चालू करण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या आहेत. उद्यापासून काम सुरु होईल. आपल्याकडे २०१३पासून लेखापाल नसल्यामुळे बिलावर सही करण्यास अकौंटंटने लेखी नकार दिला आहे. त्यामुळे बिलाचे काम रखडले आहे. लोकसंख्येच्या मानाने आपल्याला चार अभियंत्यांची गरज आहे. परंतु, सध्या आपल्याकडे एक अर्धवेळ अभियंता उपलब्ध आहे. त्याच्याकडे चिपळूण व खेडचा पदभार आहे. यावेळी नगरसेविका सुरेखा खेराडे आपल्या नेहमीच्या शैलीत उलटसुलट प्रश्न विचारत होत्या. मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्याही प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. ठेकेदार कुलकर्णी हजर झाल्यानंतर त्यांनी वस्तुस्थिती मांडली. त्यानुसार आपण अंतर्गत काम करत आहोत. उर्वरित मोठे काम करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. पैसे मिळाल्यानंतर आपण काम पूर्ण करू, असेही स्पष्ट केले. यावर मुख्याधिकारी पाटील यांनी आपण अजिबात काम बंद करू नये. उद्याच काम सुरु करावे. निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे सांगितले. (प्रतिनिधी)


उमेश सकपाळ : काम सुरु करा नाहीतर खुर्च्या खाली करा
1चिपळूणकरांना इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र लवकर सुरु करुन हवे आहे. सत्ताधारी या कामात चालढकल करीत आहेत. त्यामुळे कामाला विलंब होत आहे. सांस्कृतिक केंद्राचे काम तत्काळ सुरु करा नाहीतर खुर्च्या खाली करा, असा इशारा उमेश सकपाळ यांनी दिला.

2सांस्कृतिक केंद्राचे काम करणाऱ्या कुलकर्णी या ठेकेदाराच्या बिलावर मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी सही केली आहे. परंतु, नगराध्यक्षांनी अद्याप सही केली नाही. आज मोर्चा येणार याची कुणकुण लागल्याने नगराध्यक्षा पळाल्या, असा आरोप नगरसेविका सुरेखा खेराडे यांनी केला. परंतु, पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी बोलावल्यानुसार त्यांच्या सभेसाठी नगराध्यक्षा सावित्री होमकळस रत्नागिरी येथे गेल्या होत्या, असे समजले. स्वपक्षाच्या पालकमंत्र्यांचा दौरा कार्यक्रम नगरसेविका खेराडे यांना माहीत नसावा, यावरून त्यांचा बालिशपणा दिसून आला, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांत होती.


काम मुळीच थांबवू नका
ठेकेदाराच्या बिलावर मी आठ दिवसांपूर्वी सही केली आहे. बिलाबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बोलेन व आठ दिवसात ठेकेदाराला बिल देण्याची व्यवस्था करीन. परंतु तुम्ही उद्यापासून काम सुरु करा. कोणत्याही परिस्थितीत काम थांबवू नका, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Shiv Sena office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.