शिवसेनेने गड राखला , आघाडीतील गटबाजीचा काँग्रेसला फटका

By Admin | Updated: May 18, 2014 00:32 IST2014-05-18T00:30:59+5:302014-05-18T00:32:41+5:30

सुभाष कदम ल्ल चिपळूण ्काँग्रेस-राष्टवादीतील समन्वयाचा अभाव, अंतर्गत धुसफूस, प्रदेशाध्यक्षांच्या समर्थकांनी फिरवलेली पाठ, मोदींसाठी भाजपने

Shiv Sena has retained its fortress; | शिवसेनेने गड राखला , आघाडीतील गटबाजीचा काँग्रेसला फटका

शिवसेनेने गड राखला , आघाडीतील गटबाजीचा काँग्रेसला फटका

सुभाष कदम ल्ल चिपळूण ्काँग्रेस-राष्टवादीतील समन्वयाचा अभाव, अंतर्गत धुसफूस, प्रदेशाध्यक्षांच्या समर्थकांनी फिरवलेली पाठ, मोदींसाठी भाजपने केलेला आक्रमक प्रचार, नारायण राणे यांच्यावरील राग व्यक्त करून शिवसेनाप्रमुखांना मतांच्या रुपाने श्रध्दांजली वाहण्याचे शिवसेना नेत्यांचे आवाहन यामुळेच नीलेश राणे यांना दीड लाखाच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. या मतदार संघातून ३१ हजार १४० मतांची आघाडी मिळाली. १९९० सालापासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या चिपळूणवर शिवसेनेचा भगवा फडकला. २००४ साल याला अपवाद ठरले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश कदम निवडून आले होते. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सदानंद चव्हाण यांच्या रुपाने शिवसेनेला आमदार मिळाला. येथील खासदारही सेनेचा असावा यासाठी जोरदार प्रयत्न झाले आणि विनायक राऊत यांच्या रुपाने राणेंची मक्तेदारी मोडीत काढून शिवसेनेला पुन्हा आपला खासदार मिळाला. चिपळूण विधानसभा मतदार संघातून शिवसेनेला ३१ हजार ११४ मताधिक्य मिळाले असून हा गड सेनेने पुन्हा राखला आहे. गत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांना ५३ हजार ५२५ तर नीलेश राणे यांना ५८ हजार १४१ मते मिळाली होती. राणे यांना ४ हजार ६१६चे मताधिक्य होते. या निवडणुकीत काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, शिवसेनेचे मतदार पक्षाशी ठाम राहिले. आमदार चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक, विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, तालुकाप्रमुख सुधीर शिंदे, तालुकाप्रमुख प्रमोद पवार व त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी मेहनतीने प्रचार केला. वाढती महागाई, भ्रष्टाचार यामुळे जनता कंटाळली होती. त्यातच नरेंद्र मोदींची लाट आली. त्याचाही फायदा शिवसेनेला झाला. मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रचार केला. त्याचाही फायदा या निवडणुकीत झाला. राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी फारसे प्रचारात दिसले नाहीत. रमेश कदम हे रायगड मतदार संघात उमेदवार असल्याने त्यांनी आपल्या समर्थकांना राणे यांचे काम करण्यास सांगितले होते. परंतु, ते प्रत्यक्ष येथे नसल्याने त्याचा परिणाम मतदारांवर जाणवला. मुळात चिपळूण, संगमेश्वर मिळून काँग्रेसची जी ताकद आहे त्यापेक्षा दुप्पट ताकद या मतदार संघात राष्ट्रवादीची आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी आघाडीचा धर्म पाळत राणे यांचा प्रामाणिक प्रचार केला. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केले. मात्र, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपल्या समर्थकांनी राणेविरोधी काम केल्याची चर्चा होती. त्यामुळे जाधव यांनी शिवसेनेला छुपी मदत केली, हे राऊत यांच्या विजयाने स्पष्ट झाले आहे. राऊत यांनी निकालापूर्वीच राष्ट्रवादीचे आभार मानले, यावरुन राष्ट्रवादीचा एक गट सेनेबरोबर कार्यरत होता हे स्पष्ट होते. शिवसेनेच्या उमेदवाराचे महायुती म्हणून रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) च्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केले. चिपळूण तालुक्यात काँग्रेसचे मजबूत संघटन नाही. जे पदाधिकारी आहेत. त्यांचा जनमानसावर फारसा प्रभाव नाही. अनेक पदाधिकार्‍यांना तालुक्यात कोणी ओळखतही नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदार संघातून शिवसेना व राष्ट्रवादी अशी सरळ लढत होणार आहे. शिवसेनेतर्फे सदानंद चव्हाण पुन्हा एकदा रिंगणात असतील. राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष शेखर निकम रिंगणात येऊ शकतात. मात्र, हा निकाल पाहता राष्ट्रवादीला विजयासाठी कडी मेहनत घ्यावी लागेल.

Web Title: Shiv Sena has retained its fortress;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.