शिवसेना संघटनेतच शिस्तीला हरताळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2015 22:43 IST2015-08-30T22:43:08+5:302015-08-30T22:43:08+5:30

रत्नागिरी : नाचणे, गोळपमध्ये शिस्तीचा पंचनामा

Shiv Sena corporation strike! | शिवसेना संघटनेतच शिस्तीला हरताळ!

शिवसेना संघटनेतच शिस्तीला हरताळ!

रत्नागिरी : आदेशाला मान देणारे शिवसैनिक असे समीकरण बनलेले आहे. मात्र, गेल्या काही कालावधीत हे समीकरण बदलते आहे असे म्हणण्याजोगी स्थिती आहे. रत्नागिरीतील नाचणे ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत पक्षांतर्गत वादातूनच सेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात मतदान करून पक्षादेश झुगारण्यात आला. तर गोळप ग्रामपंचायतीत शिवसेना सदस्यांमधील अंतर्गत राजकारणामुळे येणारी सत्ता गेली. पक्षशिस्तीला हरताळ फासणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची घोषणा होऊनही अद्याप काहीच कृती न झाल्याने घोषणा हवेत विरल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.रत्नागिरी तालुक्यातील नाचणे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक पंधरा दिवसांपूर्वीच झाली. नाचणे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे सर्व १७ सदस्य विजयी झाले होते. त्यामुळे सरपंच व उपसरपंचपदासाठी शिवसेनेतच जोरदार रस्सीखेच सुरू होती. त्यावेळी सेनेच्या वरिष्ठांकडून सरपंचपदासाठी आदेश देत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयसिंग घोसाळे यांच्या पत्नी जयाली घोसाळे यांचे नाव निश्चित झाले होते. त्या बिनविरोध निवडून आल्या. मात्र, उपसरपंचपदासाठी भेय्या भोंगले हे सेनेतील नवीन गटाचे उमेदवार पक्षाने अधिकृत केले होते. मात्र, जयसिंग घोसाळे व भेय्या भोंगले यांचे राजकीय मतभेद असल्याने ग्रामपंचायत कारभारात पटणार नाही म्हणून भोंगले यांच्या नावाला विरोध झाला. त्यामुळे कपिल सुपल यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज भरला. शिवसेनेच्या सदस्यांनी भोंगले यांना मतदान करण्याचा पक्षादेश असतानाही तो धुडकावला व कपिल सुपल उपसरपंच म्हणून निवडून आले.
याप्रकाराने शिवसेनेत खळबळ माजली. सेनेतील शिस्तीचा, पक्षादेशाचा पंचनामाच झाला. सेनेत आता शिस्त पाळली नाही तरी चालते, कारवाई होत नाही, असा समज बळावत चालला आहे. कारवाईची घोषणा सेना पदाधिकाऱ्यांनी केली परंतु कारवाई झालीच नाही. त्यामुळे सेनेतील पदाधिकारीही मवाळ बनले असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्येच सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)


कारवाईची केवळ घोषणाच...
संघटनात्मक पातळीवरील सेनेतील शिस्त ही महत्वाची मानली जात असतानाही तालुक्यात जुन्या नवीन शिवसैनिकांमध्ये अजूनही खऱ्या अर्थाने मनोमिलन झाले नसल्याने मतभेदांची चर्चा नेहमीच सुरू असते. तालुक्यातील गोळप ग्रामपंचायतीत सेनेला सत्ता संपादन करण्याएवढे संख्याबळ उभे करता आले असते. मात्र, सरपंचपदावरून वाद काही मिटले नाहीत व सेनेची हाती येणारी सत्ता गेली. सेनेचा हा अनपेक्षित पराभव सर्वच कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला.

Web Title: Shiv Sena corporation strike!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.