शिवसेनेला टक्कर मनसेची
By Admin | Updated: October 2, 2014 00:09 IST2014-10-01T23:02:16+5:302014-10-02T00:09:24+5:30
सावंतवाडीत होणार बहुरंगी लढत, सर्वाधिक लक्षवेधी मतदार संघ, ८ उमेदवार रिंगणात

शिवसेनेला टक्कर मनसेची
अनंत जाधव - सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून प्रमुख पक्षांचे पाच उमेदवार रिंगणात असले तरी खऱ्या अर्थाने लढत शिवसेना विरूद्ध मनसे यांच्यात होण्याची शक्यता आहे. कारण पक्ष बदलू म्हणून राष्ट्रवादीच्या सुरेश दळवींवर शिक्का बसला असून, ज्येष्ठता डावलत तालुकाध्यक्ष बाळा गावडे यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजीचे सूर उमटत आहेत. अनेकजण उघडपणे अन्य उमेदवारांना मदत करीत आहेत, तर काहीजण दुसऱ्या पक्षांमध्ये उडी मारण्याच्या तयारीत असल्याचे सध्यस्थितीत दिसून येत आहे.
बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम वेळेपर्यंत सावंतवाडी मतदारसंघातून प्रभाव पडेल, अशा वसंत ऊर्फ अण्णा केसरकर यांनावगळता एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. माजी आमदार राजन तेली यांनी भाजपाकडून अर्ज दाखल केल्याने त्यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मागे घेतला आहे. मात्र, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील चुरस ही शिवसेना व मनसे यांच्यावरच अवलंबून असून, अन्य पक्षांच्या उमेदवारांचे चेहरे अंतिम वेळेपर्यंत मतदारापर्यंत पोहोचले नाहीत. ऐन अर्ज भरण्याच्या आधी आघाडी व युती तुटल्याने सर्वच पक्षांना उमेदवार शोधण्याची मोठी घाई झाली होती. सावंतवाडी मतदारसंघातील चित्र काही वेगळे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन तेली यांना ऐनवेळी तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. तर युती तुटल्याने भाजप उमेदवारांच्या शोधात असतानाच तेलींच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली.
दुसरीकडे राष्ट्रवादी राजन तेलींना उमेदवारी देणार असे वाटत असतानाच शिवसेनेच्या सुरेश दळवी यांनी अनपेक्षितरित्या राष्ट्रवादीमध्ये दाखल होत उमेदवारी मिळविली. पण, दळवींवर सतत पक्ष बदलू आरोप होत राहिल्याने मतदार राजा विचलित झाल्याचे दिसत आहे. माजी आमदार दीपक केसरकर हे शिवसेनेत गेल्यामुळे सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्लेमध्ये राष्ट्रवादी चांगलीच खिळखिळी झाली आहे. त्यातच आघाडी तुटल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मतांचे विभाजन झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी मागे पडत असल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, वसंत केसरकर, विकास सावंत आदी ज्येष्ठ मंडळी असतानाही या सर्वांना डावलून बाळा गावडे यांना उमेदवारी देण्यात आली. यातील प्रवीण भोसले यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, तर वसंत केसरकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी सध्या शांत राहण्याच्याच भूमिकेत आहेत. गावडे यांच्या उमेदवारीमुळे ज्येष्ठ नेत्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांमध्ये निरूत्साह असून, अनेक कार्यकर्ते हे कधी भाजप, तर शिवसेना पक्षाच्या व्यासपीठावर दिसत आहेत. काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील आठ दिवसात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कशाप्रकारे मतदारावर प्रभाव टाकेल, यावर पुढील गणित अवलंबून राहणार आहेत.
सावंतवाडी मतदारसंघात परशुराम उपरकर (मनसे), दीपक केसरकर (शिवसेना), राजन तेली (भाजप), बाळा गावडे (काँॅग्रेस), सुरेश दळवी (राष्ट्रवादी काँग्रेस) आदी प्रमुख पक्षांबरोबरच किशोर लोंढे, अजिंक्य गावडे, उदय पास्ते, संजय देसाई हे उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उभे ठाकले आहेत.
दीपक केसरकर यांनी आधीच शिवबंधन बांधून घेतले होते. मात्र राजन तेली यांनी आयत्यावेळी भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातीलच नाही तर राज्याचे लक्ष असलेला मतदार संघ म्हणून सावंतवाडीकडे पाहिले जात आहे.
फोटो : 0१ एसडब्लूडी 0६
दीपक केसरकर
फोटो : 0१ एसडब्लूडी 0७
परशुराम उपरकर
फोटो : 0१ एसडब्लूडी 0८
बाळा गावडे
फोटो : 0१ एसडब्लूडी 0९
सुरेश दळवी
फोटो : 0१ एसडब्लूडी १0
राजन तेली
सावंतवाडी
एकूण मतदार २,0२, ८३५
नावपक्ष
बाळा गावडेकाँग्रेस
दीपक केसरकरसेना
राजन तेली भाजप
सुरेश दळवी राष्ट्रवादी कॉँग्रेस
परशुराम उपरकरमनसे
किशोर लोंढे अपक्ष
अजिंक्य गावडेअपक्ष
उदय पास्तेअपक्ष