विवाहितेवरील अत्याचारप्रकरणी शिवसेना आक्रमक
By Admin | Updated: May 25, 2014 01:17 IST2014-05-25T01:00:21+5:302014-05-25T01:17:49+5:30
तपासकार्यात अडथळे

विवाहितेवरील अत्याचारप्रकरणी शिवसेना आक्रमक
राजापूर : नाटे येथे अत्यवस्थेत सापडलेल्या महिलेवरील अत्याचाराची दखल शिवसेनेने घेतली आहे. आमदार राजन साळवींच्या नेतृत्वाखाली सुमारे ७० ते ८० शिवसैनिकांनी नाटे पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि तालुक्यात असे प्रकार परत घडू नयेत, यासाठी त्यांची कुठलीच प्रकारे गय होता नये, अशी जोरदार मागणी केली आहे. तालुक्यातील नाटे पडवणे वाडीतील ३५ वर्षीय विवाहित महिला घरातून बेपत्ता झाल्यानंतर ती गावातीलच एका आंबा बागेत अत्यवस्थ अवस्थेत सापडली होती. शरीरावर झालेल्या अत्याचारामुळे ती बेशुद्धावस्थेत होती. त्यामुळे तपासकार्यात अडथळे निर्माण झाले असून पुढील दिशाच पोलिसांना सापडलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने या प्रकरणात लक्ष घातले आहे. सेनेचे आमदार राजन साळवी, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, शिवसेना विभागप्रमुख डॉ. सुनील राणे, पं. स. सदस्य दीपक नागले, सरपंच संजय बाणकर यांच्यासह सुमारे ७० ते ८० शिवसैनिकांनी नाटे पोलीस ठाण्यात धडक दिली आणि समाधानकारक तपास सुरु नसल्याने पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे उपस्थित होत्या. पीडित महिलेवर अत्याचार करणारे गुन्हेगार अद्याप मोकाट फिरत असून त्यांना अटक झालेली नाही. त्यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे शिवाय कुठल्याही प्रकारची गय केली जाऊ नये, अशा शब्दात आमदार राजन साळवींनी ठणकावून सांगितले. अनेक दिवस पोलीस कारवाई होत नसल्याने हे प्रकरण धसास लावण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घेतला आहे. बेशुद्धावस्थेत असलेली महिला हळूहळू शुद्धीवर येत असल्याची माहिती निरीक्षक मेघना बुरांडे यांनी दिली. मारहाण तसेच मोठ्या प्रमाणात झालेल्या जखमांमुळे पीडित महिलेने अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील वस्तुस्थिती पुढे येत नसून, प्रकरणातील गुंता कायम आहे. त्यामुळे हतबल झालेल्या पोलिसांपुढील आव्हान कायम असले तरी लवकरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल, अशी आशा नाटे पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)