रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या काही काळात अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेसेनेत आले आहेत. त्या सर्वांना सामावून घेण्यासाठी सध्याची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याची माहिती शिंदेसेनेचे नेते, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. येत्या ८ ते १५ दिवसांत नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.मंगळवारी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्ह्यात अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच उद्धवसेनेतील अनेकजण शिंदेसेनेत आले. निवडणुकीनंतर ‘ऑपरेशन टायगर’मध्ये या मोहिमेला जोर आला. त्यामुळे पक्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे, असे ते म्हणाले.नव्याने पक्षात आलेल्या सर्वांना कार्यकारिणीमध्ये सामावून घेतले जाणार आहे. त्यासाठीच जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. आता नव्या आणि जुन्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली नवी कार्यकारिणी येत्या ८ ते १५ दिवसांत जाहीर केली जाईल, असे ते म्हणाले. या नियुक्त्या झाल्यानंतर पक्ष अधिक जोमाने काम करेल आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचेल, अशी खात्रीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.लोकाभिमुखतेचा निकषनव्या कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी निवडताना लोकाभिमुखता हाच निकष लावला जाणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जो तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला आहे, अशांनाच ही संधी मिळणार आहे.दापोली मतदारसंघात कोणताही बदल नाहीदापोली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांमध्ये कोणताही बदल करू नये, असे राज्यमंत्री योगेश कदम यांचे मत होते. त्यामुळे दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यातील पदाधिकारी कायम ठेवण्यात आले आहेत.
शिंदेसेनेची रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त, दापोलीत मात्र बदल नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 19:09 IST