रत्नागिरीत सर्वत्र शिमगोत्सवाची धूम, ग्रामदेवतांच्या पालख्या भाविकांच्या भेटीला येणार

By मेहरून नाकाडे | Published: March 23, 2024 06:03 PM2024-03-23T18:03:12+5:302024-03-23T18:06:54+5:30

शिमगोत्सवासाठी खास झेंडे, टीशर्ट विक्रीसाठी

Shimgotsavam is everywhere In Ratnagiri, palanquins of village deities will visit the devotees | रत्नागिरीत सर्वत्र शिमगोत्सवाची धूम, ग्रामदेवतांच्या पालख्या भाविकांच्या भेटीला येणार

रत्नागिरीत सर्वत्र शिमगोत्सवाची धूम, ग्रामदेवतांच्या पालख्या भाविकांच्या भेटीला येणार

रत्नागिरी : जिल्ह्यात फाक पंचमीपासून गावाेगावी शिमगाेत्सवाचे ढाेल वाजू लागले आहेत. काही गावातून शुक्रवारी (दि.२२) तेरसे शिमगे साजरे करण्यात आले. मात्र होळी पाैर्णिमेचा सण रविवारी (२४ मार्च) साजरा होणार आहे. त्यादिवशी २ हजार ८४० खासगी तर सार्वजनिक १ हजार ३१२ होळ्या उभ्या करण्यात येणार आहेत. तसेच १५२० ग्रामदेवतांच्या पालख्या भाविकांच्या भेटीला येणार आहेत.

कोकणात शिमगोत्सव माेठ्या उत्साहात साजरा केला जाताे. शिमगोत्सव साजरा करण्याची पध्दतीही प्रत्येक गावातील वेगवेगळ्या आहेत. शिमगाेत्सवात ग्रामदेवतेच्या पालख्या घरोघरी येत असल्याने नाेकरीनिमित्त दूरवर राहणारा गावकरी उत्सवाला आवर्जून खरी येताे. जिल्ह्यात दि. २४ व २५ रोजी भद्रे शिमगे साजरे करण्यात येणार आहेत. होळीची जोडून सुट्टी आल्याने भाविक मोठ्या प्रमाणावर गावी आले आहेत. मुंबईकरांसाठी रेल्वे तसेच राज्य परिवहन महामंडळातर्फे होळी स्पेशल गाड्या सोडल्या आहेत.

होळी पाैर्णिमेला ग्रामदेवतेच्या पालखीला रूपे लावून सजविण्यात येते. पालखी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर होळी तोडण्यासाठी जाते. होळीसह पालखी सहाणेवर विराजमान होते. दुसऱ्या दिवशी (दि. २५) पालखी, होळीसह होमाच्या ठिकाणी येते. होळी उभी केल्यानंतर होम पेटविला जातो. गाऱ्हाणे घातले जाते, नवविवाहित दाम्पत्य जोडीने होमामध्ये नारळ अर्पण करतात. काही गावांतून रंगपंचमीपर्यंत तर काही गावांतून गुढीपाडव्यापर्यंत शिमगोत्सव साजरा केला जातो.

शिमगोत्सवात श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद तसेच अन्य विविध धार्मिक कार्यक्रमासह ढोलवादन, पालखी नाचविण्यासाठी तरुणाईचा उत्साह अधिक असतो. काही ठिकाणी ढोलवादन, पालखी नाचविण्याच्या स्पर्धा सुध्दा आयोजित केल्या आहेत. उत्सवासाठी ग्रामदेवतांची मंदिरे सुशोभित करण्यात आली आहेत. सहाणेवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पालखी, होळी येण्याच्या मार्गावर रांगोळ्या घालण्यात आल्या आहेत. घरोघरी पालखी येत असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिमगोत्सवासाठी खास झेंडे, टीशर्ट विक्रीसाठी आली आहेत.

Web Title: Shimgotsavam is everywhere In Ratnagiri, palanquins of village deities will visit the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.