पाेलीस उपनिरीक्षकपदी शीतल पाटील रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:35 IST2021-09-12T04:35:29+5:302021-09-12T04:35:29+5:30
दापोली : दापोली पोलीस स्थानकात पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी कार्यभार स्वीकारला असून, महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत ...

पाेलीस उपनिरीक्षकपदी शीतल पाटील रुजू
दापोली : दापोली पोलीस स्थानकात पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी कार्यभार स्वीकारला असून, महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. मालवण येथून उपनिरीक्षक शीतल पाटील यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाली आहे. त्यानंतर, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांची दापोली पोलीस स्थानकात नियुक्ती केली. त्या दापोली पोलीस स्थानकात रुजू झाल्या आहेत.
फोटोग्राफी कार्यशाळा
दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स काॅलेजमध्ये ऑनलाइन फोटोग्राफी कार्यशाळा झाली. विद्यार्थ्यांना छायाचित्रकार ॲड.किशोर गुमास्ते यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या फोटोग्राफीचा खजिना सर्वांसाठी खुला करीत, विविध फोटो दाखवून निसर्ग, नृत्य, पुरातून मंदिरे आदी स्थळांचे आकर्षक फोटो कसे काढावेत, याबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यालयाचे उद्घाटन
दापोली : राजे स्पोर्ट्स पोलीस व सैन्य भरती प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयाचा प्रारंभ आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आला. दापोली तालुक्यातील ज्या विद्यार्थ्यांना सैन्यात भरती व्हायचे आहे, अशांना मार्गदर्शन मिळेल. या अकॅडमीत प्राचार्य संदेश चव्हाण यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. या प्रशिक्षण केंद्रातून उत्तम खेळाडू घडावेत, अशी अपेक्षा आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केली.
प्राथमिक केंद्रात रूपांतर
दापोली : तालुक्यातील आरोग्य उपकेंद्राचे वेळवीचे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूपांतर होणार असून, नवीन इमारत बांधण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. ठेकेदाराला या कामाची वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे. वेळवी येथील आरोग्य उपकेंद्राचे रूपांतर प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात यावे, अशी वेळवी पंचक्रोशीतील नागरिकांची गेले अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे.
युवामंचने भरले खड्डे
दाभोळ : दापोली-मंडणगड मार्गावरील खेर्डी येथे पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली होती. त्यामुळे माजी सरपंच व युवामंच खेर्डी मुंबई- ग्रामीणच्या सभासदांनी तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजविले असून, यामुळे वाहन चालकांकडून समाधान व्यक्त होत आहे. या रस्त्याची चाळण होऊनही शासकीय यंत्रणेकडून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे प्रयत्न न करण्यात आल्याने, ग्रामस्थ व वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.