परिस्थितीनंच तिला घडवलं, परीक्षेत चमकवलं!
By Admin | Updated: June 18, 2014 00:55 IST2014-06-18T00:50:28+5:302014-06-18T00:55:46+5:30
शिक्षकांचा आणि आईवडिलांचा विश्वास सार्थ ठरवला

परिस्थितीनंच तिला घडवलं, परीक्षेत चमकवलं!
उमेश पाटणकर / रत्नागिरी
रत्नागिरी : तिनं परिस्थितीशी दोन हात केले, परिश्रमाला ती घाबरली नाही आणि हे करताना पुस्तकांशी नातं तिनं तोडलं नाही आणि यशानंही तिची साथ सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिच्या पदरात यशाचं भरभरून माप टाकलं. ७३.०८ टक्के गुण मिळवत तिने आपल्या शिक्षकांचा आणि आईवडिलांचा विश्वास सार्थ ठरवलाय.
तालुक्यातील फणसवळे येथील प्रीती चंद्रकांत पड्यार असं या यशस्विनीचं नाव! शाळेच्या वेळात अभ्यास आणि अन्यवेळी घरकाम प्रसंगी मोलमजुरी करुन स्वत:च्या शिक्षणाच्या खर्चासह घरखर्चाला हातभार लावला. पुढील शिक्षणाची दिशा ठरली नसली तरी संधी मिळाल्यास उच्च शिक्षण घ्यायचा ती विचार करतेय. फणसवळेसारख्या गावात शिक्षणाची व्यवस्था नसल्याने प्रीतीने आपले नाव गोदूताई जांभेकर विद्यालयात दाखल केले. शिक्षणाची प्रचंड इच्छा असताना घरच्या कामांची जबाबदारीसाठी उचलावी लागली. स्वत:सह भावंडांचे शिक्षण व्यवस्थित व्हावे आणि घरखर्चाला हातभार लागावा यासाठी तिने कामाच्या आणि अभ्यासाच्या वेळा ठरवून टाकल्या. रविवार आणि अन्य सणांच्यानिमित्ताने मिळणाऱ्या सर्व सुट्या मोलमजुरी जाऊ लागल्या. मोठी सुट्टीही कामातच संपत असे. शाळेच्या दिवशी सकाळ-संध्याकाळ घरातील कामांचा निपटारा तिने स्वत:हून सुरु केला. शाळेच्या वेळाव्यतिरिक्त बस प्रवासातील वेळ हाच काय तो तिच्या अभ्यासाचा वेळ. गृहपाठ अपूर्ण आहे म्हणून सुरुवातीच्या काळात शिक्षकांचा ओरडाही तिने खाल्ला. पण वर्गात मिळणारी उत्तरे आणि परीक्षेतील गुण यामुळे ती आपसुकच शिक्षकांची लाडकी झाली. सुरुवातीचे काही महिने शाळेतले जादा तास तिने चुकवले ते घरच्या कामासाठी. पण शिक्षकांनी त्यासाठीही तिला मुभा दिली. नंतर मात्र तिच्या आईने व बहिणीने दहावीचे महत्व ओळखून घरातील काम तिच्याकडून काढून घेतले. यामुळे तिला शाळेतील जादा तासांना उपस्थित राहता येऊ लागले. हलाखीच्या परिस्थितीत तिने मिळवलेले यश म्हणजे गोदूताई जांभेकर विद्यालयातील खरी शिकवण आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.