‘ती’ निर्दोष, तरीही वनवास!
By Admin | Updated: October 22, 2015 00:50 IST2015-10-22T00:22:00+5:302015-10-22T00:50:00+5:30
व्यसनाच्या आहारी गेलेल्या पतीची मुलानेच हत्या केली. एक मुलगा आधीच बेपत्ता झालेला.

‘ती’ निर्दोष, तरीही वनवास!
नात्यांची अशीही शिक्षा : कुंकू पुसले, मुलगा तुरूंगात
अमरावती : व्यसनाच्या आहारी गेलेल्या पतीची मुलानेच हत्या केली. एक मुलगा आधीच बेपत्ता झालेला. दुसराही आता तुरूंगात. ‘ती’ निर्दोष असतानाही तिच्या नशिबी असा वनवास आला आहे. नात्यांनी दिलेली शिक्षा आता तिला आयुष्यभर मुक्यानेच भोगावी लागणार आहे. वडाळीतील प्रबुध्दनगरात मंगळवारी वडिलांची मुलाने हत्या केल्यानंतर प्राक्तनाचे भोग पाहून विलाप करणाऱ्या निर्दोष बेबीतार्इंची अवस्था बघवली जात नाही.
महादेव व बेबी उघडे या दाम्पत्याने हलाखीच्या स्थितीत विनोद व प्रमोद या दोन मुलांचे संगोपन केले. महादेव यांनी सायकल दुरूस्तीचा दुरुस्तीचा व्यवसाय करून कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. मात्र, नंतर ते व्यसनाधीन झाले आणि बेबीतार्इंच्या नशिबी दु:खाचे सत्र सुरू झाले. कशीबशी दोन्ही मुले लहानाची मोठी झाली. हळूहळू मुलगा विनोदही व्यसनाधीन झाला. दुर्देव कमी की काय म्हणून मध्यतंरी मोठा मुलगा प्रमोद घर सोडून निघून गेला. तो पुन्हा परतलाच नाही. परंतु नवरा आणि एका मुलाच्या बळावर बेबीताई जगत होत्या. दररोज पती दारू पिऊन बेबीतार्इंना शिवीगाळ करी. मात्र, मुलाला ही बाब सहन होत नव्हते. त्यामुळे वडिल व मुलांचे दररोज वाद व्हायचे. त्या वादात मध्यस्थी करून वाद मिटवायच्या. हे दररोजचेच झाले होते. घटनेच्या दिवशीही बाप-लेकांमध्ये असाच वाद झाला. मात्र, हा वाद शेवटचा व विनाशकारी ठरेल, असे बेबीतार्इंना वाटले नव्हते. आपण मध्यस्थी करून दोघांनाही शांत करू, असे त्यांना वाटले. पण, मुलाचा संताप आणि नवऱ्याचे व्यसन यामुळे होत्याचे नव्हते झाले. मुलाने बापाचा क्रूरपणे खून केला. डोळ्यांदेखत बेबीतार्इंचा कसाबसा सावरलेला संसार उध्वस्त झाला. मुलाच्या हाती हातकड्या आणि नवऱ्याचे रक्ताने माखलेले कलेवर पाहून त्या स्तंभित झाल्या आहेत. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आता त्यांना आयुष्यभर एकटीने भोगावी लागणार आहे. यापेक्षा दुर्देव ते काय असणार?