चिपळुणात शतायू ग्रंथालय अधिवेशन
By Admin | Updated: January 6, 2015 21:52 IST2015-01-06T21:51:06+5:302015-01-06T21:52:15+5:30
सुवर्ण महोत्सवी वर्ष : तीन दिवस भरगच्च कार्यक्रम, लोकसभा अध्यक्षांची उपस्थिती

चिपळुणात शतायू ग्रंथालय अधिवेशन
चिपळूण : येथील लोकमान्य टिळक वाचन स्मारक मंदिर स्थापनेचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना वाचनालयातर्फे दि. ९ ते ११ जानेवारी या कालावधीत शतायु ग्रंथालये व ग्रंथकार अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील अण्णासाहेब खेडेकर स्टेडियममध्ये रंगणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन दि. ९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या अधिवेशनाचे अध्यक्षपद ८८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदांनद मोरे भूषविणार आहेत. उद्घाटन समारंभाला केंद्रीय मंत्री अनंत गीते, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्षा सावित्री होमकळस उपस्थित राहणार आहेत.
शनिवार, दि. १० रोजी सकाळी ९.३० वाजता प्रा. मिलिंद जोशी हे प्रा. सदानंद मोरे यांची मुलाखत घेणार आहेत. ११.३० वाजता बाबा परीट यांच्या अध्यक्षतेखाली ज्योतिराव फडतरे, श्रीराम दुर्गे, हिंमत पाटील, रवींद्र कोकरे यांचे कथाकथन, दुपारी शतकोत्तर ग्रंथालयाची वाटचाल व समस्या या विषयावर चर्चासत्र, सायंकाळी ४ वाजता कवी संमेलन होईल. कवी संमेलनाचे अध्यक्ष नितीन तेंडुलकर असतील. त्यात कैलास गांधी, राजेंद्र आरेकर, रश्मी कशेळकर, राष्ट्रपाल सावंत, सचिन चव्हाण, ईश्वरचंद्र हलगरे, मंगेश मोरे, ज्ञानेश्वर झगडे, सुनील कदम, यशवंत कदम, प्रा. संतोष गोणबरे सहभागी होणार आहेत. सायंकाळी डॉ. रेखा देशपांडे लेखिका उमा कुलकर्णी यांची मुलाखत घेतील. रात्री ९ वाजता राजेंद्र कुलकर्णी यांचे बासरी वादन होईल. यामध्ये कवीवर्य बंडा जोशी, अनिल दीक्षित, संदीप आरवट सहभागी होणार आहेत. सकाळी ११.३० वाजता साहित्य समाज व उदासीनता या विषयावर परिसंवादात मोनिका गजेंद्र गडकर अध्यक्षा, डॉ. सागर देशपांडे, डॉ.प्रदिप कर्णिक, रवींद्र घाटपांडे, अरुण जाखडे सहभागी होणार आहेत. सायंकाळी सौमित्र पाटील व आसावरी जोशी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांची मुलाखत घेणार आहेत. कादंबरीकार डॉ. तानाजी चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारोप समारंभाला मकरंद अनासपुरे, डॉ. सागर देशपांडे, नगराध्यक्षा सावित्री होमकळस उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन लोटिस्माचे अध्यक्ष अरविंद जाधव, कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह प्रकाश काणे, धनंजय चितळे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)