चिपळूण : येथील कृषी महाेत्सवाचा उद्घाटन साेहळा आटाेपून परत जाताना हेलिकाॅप्टरचे वजन वाढल्याने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे हेलिकाॅप्टर २० मिनिटे हवेतच राहिले हाेते. वैमानिकाने सलग दाेनवेळा ‘टेकऑफ’ घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्रयत्न असफल ठरले. अखेर शरद पवार यांच्या अंगरक्षकाला खाली उतरवल्यानंतर तिसऱ्या वेळी हेलिकाॅप्टरने आकाशात उड्डाण केले.वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे चिपळूण बहादूरशेखनाका येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मैदानात रविवारी कृषी महोत्सवाचा उद्घाटन समारंभ आटोपून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार दुपारी दीडच्या सुमारास परतीच्या प्रवासाला निघाले. शहरातील पवन तलाव मैदान येथे हेलिकॉप्टरमध्ये बसून त्यांनी उड्डाण केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अंगरक्षक यांच्यासह सहा माणसे हाेती. हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर काही क्षण ठराविक उंचीवर हेलिकॉप्टर फिरत राहिले. काही वेळाने ते खाली आले आणि परत उडाले असता, पुन्हा काही अंतरावर थांबले. हेलिकाॅप्टर उडत नसल्याचे लक्षात येताच प्रशासनाची तारांबळ उडाली. त्याचवेळी हेलिकॉप्टरमधील वजन अधिक झाल्याचे लक्षात आल्याने पुन्हा हेलिकॉप्टर खाली उतरवून अंगरक्षकाला खाली उतरवण्यात आले. अंगरक्षकाला खाली उतरवताच हेलिकाॅप्टरने उड्डाण केले. यावेळी चिपळूणकरांनी हात उंचावून शरद पवार यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
अंगरक्षकाला उतरवताच शरद पवारांच्या हेलिकाॅप्टरचे ‘टेकऑफ’, वजन जादा झाल्याने उड्डाणात अडचण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:26 IST