कलाकार निमकर ठरले शापीत गंधर्व
By Admin | Updated: September 15, 2014 23:22 IST2014-09-15T22:43:21+5:302014-09-15T23:22:18+5:30
तीन दशकांची सेवा: शासन दरबारी दखल नाही

कलाकार निमकर ठरले शापीत गंधर्व
रत्नागिरी : गेली तीन दशके चिपळूणच्या सांस्कृतिक क्षेत्रात कलाकार या नात्याने स्वतंत्र भूमिका निभावणारे गायक चंद्रकांत निमकर हे कलाकार मानधनापासून वंचित आहेत. संगीत क्षेत्रात कामगिरी करणारे निमकर हे शासन दरबारी मात्र शापीत गंधर्व ठरले आहेत. कोकण साहित्यिकांची खाण, चिपळूण हे संगीत रंगभूमीवरील दिग्गज कलावंत असलेले ठिकाण आहे. नाट्यपंढरी म्हणून या भूमीला अनेकांनी पसंती दिली आहे. याचाच परिपाक म्हणून दिल्ली दरबारी संगीत रंगभूमीवर कलाकारांचे सादरीकरण करण्याची संधी या ठिकाणी लाभली. कलाकार घडवण्याचे श्रेय काही कलाकारांना जाते. त्यापैकीच निमकर हे एक ज्येष्ठ कलावंत गायक आहेत. १९८५ पासून काल-परवापर्यंत निमकरांनी संगीत रंगभूमीची सेवा केली. वयाच्या पन्नाशीत निमकर यांनी ख्यालवर ताबा घेतला. पंडित प्रभाकर कारेकर यांच्या गाण्याचा प्रभाव निमकर यांच्या गाण्यावर सतत राहिला. छोटा गंधर्वांच्या साऱ्या नाट्यगीतांची तहान निमकर यांच्या गाण्यातून भागवली जायची.
चिपळूणची भूमी कलाकारांना सम्मान देणारी आहे. राम मंदिरात होणारी संगीत नाटके, उत्सवप्रसंगी सादर होणारी संगीतरजनी व स्वत:च्या तुटपुंज्या साहित्यासह दोन जिल्हे हिंडण्याची त्यांनी साधलेली किमया या गोष्टीवर निमकर हे लोकप्रिय ठरले. मात्र, अशा कलाकाराची दखल शासनाच्या कलाकार मानधन योजनेत घेतली गेली नाही.
अपार कष्ट करून घरातील कुटुंबाची जबाबदारी एकट्याने पेलली. अशा परिस्थितीत बुवांनी संगीतसाधना केली. तानपुरा, संवादिनी मिळेल त्या साधनांसह केलेली संगीतासेवा या सर्व गोष्टींवर आजही निमकर हे तरुण संगीतकारांना मार्गदर्शक ठरत आहेत. मात्र, शासनदरबारी हा कलाकार शापीत गंधर्व ठरला आहे.
दरवर्षी कलाकार मानधन योजनेसाठी विविध कलाकाराकडून प्रस्ताव मागवले जातात पण कधी तरी या ज्येष्ठ कलावंताकडे शासन पायधूळ ढाडणार काय असा सवाल करीत निमकर यांच्यासारखे या क्षेत्रात योगदान दिलेले कलाकार मात्र वंचित राहिले.( प्रतिनिधी)
जय जय गौरी शंकर, संगीत सौभद्र, स्वयंवर, मानापमान, सुवर्णतुला, मदनाची मंजिरी, संत गोरा कुंभार अशा नाटकांतून निमकर यांनी भूमिका साकारल्या. या साऱ्या भूमिका त्यांनी वठवल्या असल्या तरी आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत त्यांची न घेतली गेलेली दखल अनेकांना खंत व्यक्त करायला लावते.
चिपळूणचे संगीत क्षेत्र वैभवसंपन्न करण्यात निमकर यांचा वाटा महत्त्वाचा.
परिस्थिती प्रतिकूल तरीही संगीत साधनेत खंड नाही.
कोकणात संगीत नाटकांची परंपरा मोठी. निमकर यांनी असेल त्या परिस्थितीशी सामना करीत अनेक कार्यक्रम केले.
ज्येष्ठत्वाकडे झुकले.