गद्दारांची सावली शिवसेनेवर कधीच नको
By Admin | Updated: August 3, 2014 22:46 IST2014-08-03T21:54:28+5:302014-08-03T22:46:36+5:30
कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका : सुभाष बने यांच्या प्रवेशाला शिवसेनेतूनच जोरदार विरोध

गद्दारांची सावली शिवसेनेवर कधीच नको
देवरुख : शिवसेनेत पुन्हा प्रवेश करणाऱ्यांच्या विरोधात सेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी रणशिंग फुंकले असून, कोणत्याही परिस्थितीत त्यांना शिवसेनेत घेतले जाऊ नये. अशा गद्दारांची सावली शिवसेनेवर नको, अशी ठाम भूमिका संगमेश्वर तालुक्यातील शिवसैनिकांनी रविवारी दुपारच्या मेळाव्यात मांडली.
देवरुख शहरातील नृसिंह मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यामध्ये अनेकांनी पोटतिडकीने आपली भूमिका स्पष्ट केली. संपूर्ण सभागृहाचे मत यापूर्वी असणाऱ्यांना पक्षात थारा देऊ नये, अशाच प्रकारचे व्यक्त झाले. काँग्रेसमधील काही नेते, कार्यकर्ते, मनसेतील काही मंडळी शिवसेनेच्या वाटेवर आहेत. अशा बातम्या वारंवार येऊ लागल्याने तालुका ढवळून निघाला होता. अनेकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अशावेळी ८ आॅगस्ट रोजी आयोजित केलेला मेळावा अचानक रद्द करुन ३ रोजी घेण्यात आला.या मेळाव्यात अनेकांना आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख प्रमोद पवार म्हणाले की, शिवसेनेला याची गरज होती तेव्हा यांनी सेनेशी बंडाची भाषा केली आणि आज त्यांना पदे मिळत नसल्याने आणि सेनेची सत्ता येणार म्हणून केवळ फळे चाखायला, पदे मिळवायला हे सेनेत येऊ पाहात आहेत. अशांना कशासाठी घ्यायचे? हाच सूर शिवसैनिक सुरेश रसाळ, आबा खेडेकर, ललिता गुडेकर, रवींद्र सावंत, श्रीकृष्ण जागुष्टे, प्रसाद सावंत, अशोक सप्रे, उपसभापती संतोष थेराडे, नगरसेवक नंदादीप बोरुकर यांनीही आळवला.आम्ही आजपर्यंत सेनेच्या पाठीशी उभे राहात आलो. देवरुखात सेना वाढविण्याचे काम करीत आलोय. आज आम्ही कमी पडतोय का...? आणि म्हणून बंडखोरांना पुन्हा घेतले जातेय, असे बोलत सेनेत कोण घेत आहे हा निर्णय कुणाचा आहे, याबाबत आमदार सदानंद चव्हाणांनी खुलासा करावा, असे बोरुकर यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर बोलताना चव्हाण म्हणाले की, १९ जुलै रोजी रवींद्र नाट्यमंदिरात झालेल्या कार्यक्रमात सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर व अन्य मंडळींनी संगमेश्वरातील काही मंडळी सेनेत पुन्हा येऊ पाहात असल्याचा विषय आपल्याजवळ काढल्याचे स्पष्ट केले. मात्र, आपण याबाबत कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. तसेच पक्षप्रवेशाच्या तारखेबद्दलदेखील मला काहीच माहीत नव्हते, असे बोलून आपण हा विषय जिल्हाप्रमुखांच्या कानी घातल्याने स्पष्ट केले.
संघटनेत अनेकांना चटके बसले आहेत. म्हणूनच हे वैभव प्राप्त झाले आहे. या वैभवाचा खरा हकदार सामान्य शिवसैनिक आहे आणि आज पदे घेण्याची त्यांची वेळ आली असताना ती त्यांची हक्काची जागा दुसरा कोणी घेणार असेल तर ते होऊ देणार नाही. शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांना पक्षात थारा नको. या साऱ्यांच्या भावनेचा मीही आदर करीत आहे. त्यामुळे पक्ष मॅनेज करु पाहणाऱ्यांना पक्षात नको. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आता संभ्रमात राहण्याची गरज नाही. भगव्याचा झंजावात थांबवण्याची ताकद सध्या कुठल्या पक्षात दिसत नसल्याचे मत जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी परखडपणे व्यक्त केले. (प्रतिनिधी)