विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण, ग्रंथपालास अटक
By Admin | Updated: January 14, 2015 00:41 IST2015-01-14T00:05:02+5:302015-01-14T00:41:51+5:30
एका महिला पालकाला तिच्या मुलीबरोबर बोलताना प्रथम या निंदनीय प्रकरणाचा खुलासा झाला.

विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण, ग्रंथपालास अटक
गुहागर : आरजीपीपीएल वसाहतीतील बालभारती पब्लिक स्कूलमधील चिमुरड्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण प्रकरणी पब्लिक स्कूलच्या ग्रंथपालास गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. रुपेश खरे (२५) असे या तरुणाचे नाव आहे. पालकांच्या सतर्क तेमुळे गेले कित्येक दिवस सुरु असलेले हे प्रकरण उघडकीस आले आहे. तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित व सुशिक्षित नागरिकांची मुले या सीबीएससी बोर्डाच्या पूर्ण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहेत. दि. १२ रोजी दुपारी शाळा सुटल्यावर मुले घरी आली. त्यावेळी गुहागर येथील एका महिला पालकाला तिच्या मुलीबरोबर बोलताना प्रथम या निंदनीय प्रकरणाचा खुलासा झाला.
ग्रंथपाल खरे हा विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करीत असल्याचे, या मुलीने आईला सांगितले. मुलीला विश्वासात घेऊन पालकांनी तिच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली असता, तिने पिडीत असलेल्या आणखी मुलींची नावे सांगितली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकांनी नावे समोर आलेल्या मुलींच्या पालकांची भेट घेऊन चर्चा केली. मंगळवारी मोठ्या संख्येने पालक बालभारती शाळेत पोहोचले. घडल्या प्रकाराने आक्रमक झालेल्या पालकांनी मुख्याध्यापकांच्या कक्षातच रुपेश खरे याची धुलाई केली. याप्रकरणी या ग्रंथपालाला अटक करण्यात आले आहे. (वार्ताहर)