खेडमधील तरुणाचे सेक्सटॉर्शन, राजस्थानातून भामट्याला अटक

By मनोज मुळ्ये | Published: March 5, 2024 06:25 PM2024-03-05T18:25:41+5:302024-03-05T18:28:27+5:30

मेहजर हुसैन याला केलेल्या ऑनलाइन मनी ट्रान्सफरचा पाेलिसांनी शाेध घेत केली अटक

Sextortion of youth in Khed Ratnagiri district, One arrested from Rajasthan | खेडमधील तरुणाचे सेक्सटॉर्शन, राजस्थानातून भामट्याला अटक

खेडमधील तरुणाचे सेक्सटॉर्शन, राजस्थानातून भामट्याला अटक

खेड : शहरातील एका तरुणाला सेक्सटॉर्शन करून आर्थिक मोबदल्यासाठी ‘ब्लॅक मेल’ करणाऱ्या भामट्याला खेड पाेलिसांनी राजस्थानमधील फतेहपूर येथून अटक केली. विशेष म्हणजे संशयित हा सेक्सटॉर्शनच्या माध्यमातूनच आपला उदरनिर्वाह करत असल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये आढळले आहे.

मेहजर अली इकबाल हुसैन (रा. फतेहपूर, ता. पहाडी, जि. डिग, राजस्थान) असे या संशयिताचे नाव असून, हा प्रकार ५ नाेव्हेंबर २०२२ राेजी घडला हाेता. शहरातील एका व्यक्तीला मेहजर हुसैन याने व्हाॅट्सॲप व्हाईस कॉल केला. संभाषण संपताच संगणकाचा उपयोग करून बदल घडवून आणण्यात आलेले फोटो त्या व्यक्तीला पाठविण्यात आले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, घाबरलेल्या तक्रारदार तरुणाने मेहजरने मागितल्याप्रमाणे गुगल पेच्या माध्यमातून दोनवेळा प्रत्येकी १५ हजारप्रमाणे असे तीस हजार रुपयाची रक्कम दिली. मात्र, या प्रकरणी तरुणाने खेड पोलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानंतर खेड पाेलिस स्थानकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक नितीन भोयर व पाेलिस काॅन्स्टेबल वैभव ओहाेळ, पाेलिस काॅन्स्टेबल कृष्णा बांगर यांच्या पथकाने तपासाला गती दिली.

मेहजर हुसैन याला केलेल्या ऑनलाइन मनी ट्रान्सफरचा पाेलिसांनी शाेध घेतला. या तपासामध्ये राजस्थानमधील फतेहपूर येथील मेहजर अली इकबाल हुसैन या व्यक्तीचे नाव समोर आले. खेड पोलिसांनी त्याच्या ठावठिकाणाबाबत गोपनीय माहिती काढली व त्याला सोमवारी (दि. ४) ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून वापरण्यात आलेले दोन मोबाइल फोन व चार विविध मोबाइल कंपनीचे सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.

Web Title: Sextortion of youth in Khed Ratnagiri district, One arrested from Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.