सात लाखांची मासळी जप्त
By Admin | Updated: October 27, 2015 00:24 IST2015-10-26T22:37:26+5:302015-10-27T00:24:08+5:30
‘त्या’ ट्रॉलर्सवर कारवाई : ४२ लाखांच्या दंडाची शिफारस, तहसीलदारांकडे प्रस्ताव

सात लाखांची मासळी जप्त
मालवण : समुद्रातील संघर्षानंतर कर्नाटकातील चार हायस्पीड ट्रॉलर्समधील मासळीचा मत्स्य विभागाने रविवारी रात्री उशिरा पंचनामा केला. चारही ट्रॉलर्समध्येसुरमई, पापलेट, सारंगा, आदी प्रकारची सुमारे सात लाखांची मासळी सापडली आहे. महाराष्ट्र हद्दीतील मासेमारी परवाना नसताना मासेमारी केल्याप्रकरणी ट्रॉलर्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. याबाबत सोमवारी मालवण तहसीलदारांकडे कारवाई प्रस्ताव सादर करण्यात आला. ट्रॉलर्सवर ४२ लाखांच्या कारवाईची शिफारस मत्स्य विभागाने केली आहे.
दरम्यान, मालवणमधील ट्रॉलर्स संघटनेचे अध्यक्ष अशोक तोडणकर व मच्छिमारांनी तहसीलदार वनिता पाटील यांची भेट घेऊन हायस्पीड ट्रॉलर्सवर जास्तीत जास्त दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे. गेले काही दिवस कर्नाटकातील अशा शेकडो हायस्पीड ट्रॉलर्सनी मालवणमधील मच्छिमारांच्या शेकडो ट्रॉलर्सचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. ही नुकसानभरपाई या ट्रॉलर्ससह कर्नाटकातील हायस्पीड संघटनेने द्यावी. तसेच सिंधुदुर्ग किनारपट्टीवर ३५ ते ४० वाव
खोल समुद्रात मासेमारी करण्यास
येऊ नये हे स्पष्ट करावे. त्यानंतर पकडलेल्या ट्रॉलर्ससह खलाशांची सुटका केली जावी, अशीही मागणी केली आहे.
‘दयामाई’वर मोठी कारवाई होणार?
ताब्यात घेण्यात आलेले खलाशी मत्स्य विभाग व पोलिसांच्या देखरेखीखाली असल्याचे मत्स्य विभागाने स्पष्ट केले. तर ‘दयामाई’ या बोटीवरील दोन लाख ५६ हजार किमतीची मासळी व त्यावर पाचपट दंड अशा १५ लाखांच्या कारवाईचा प्रस्ताव आहे. मालवण तालुक्यातील हा सर्वांत मोठ्या कारवाईचा प्रस्ताव असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे मोठ्या कारवाईकडे मच्छिमारांचे लक्ष आहे.
चौकशीअंती कारवाई
मालवणमधील ट्रॉलर्सधारक व गिलनेट (न्हय) पद्धतीच्या मच्छिमारांनी पोलीस प्रशासनास इशारा दिल्याप्रमाणे रविवारी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर धुडगूस घालणाऱ्या परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सना पकडले.
सोमवारी या हायस्पीडचे मालक मालवणमध्ये दाखल झाले. पोलीस प्रशासनाशीही त्यांनी चर्चा केली. रविवारी रात्री मत्स्य विभागाने ट्रॉलर्स ताब्यात घेऊन त्यांचे पंचनामे रात्री उशिरा पूर्ण केले. यात सुवर्णमंगला (दोन लाख ३३ हजार ७००), दयामाई (दोन लाख ५६ हजार ५५०), सीताप्रकाश (७१ हजार ९२५), जय हनुमाई (एक लाख ४० हजार ४००) अशी एकूण सात लाख दोन हजार ७७५ रुपयांची मासळी बोटींवर मिळाली आहे.
या बोटींवर पाचपट दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव मत्स्य विभागाकडून तहसीलदारांकडे सायंकाळी सादर करण्यात आला. याबाबत चौकशी सुनावणीची तारीख निश्चित करून चौकशीअंती कारवाई करण्यात येणार आहे.