लसीसाठी ज्येष्ठ नागरिकांची ओढाताण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST2021-05-11T04:33:39+5:302021-05-11T04:33:39+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात सर्वत्र सध्या लसीकरण सुरू झाले आहे. २ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तिंना कोरोना प्रतिबंधक लस ...

लसीसाठी ज्येष्ठ नागरिकांची ओढाताण सुरूच
रत्नागिरी : जिल्ह्यात सर्वत्र सध्या लसीकरण सुरू झाले आहे. २ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तिंना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. आधीच लसचा अनियमित पुरवठा असताना आता या वयोगटाला लस सुरू केली आहे. लसच्या उपलब्धतेनुसार कधी १८ ते ४४, तर कधी ४५ वर्षांवरील व्यक्तिंना लस दिली जात आहे. मात्र, यात काही ज्येष्ठ नागरिकांना अजूनही पहिली लस मिळाली नाही. तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांना लस घेऊन महिना उलटला आहे, अशांपैकी काहींना अजूनही दुसऱा डोस मिळविण्यासाठी ओढाताण करावी लागत आहे.
१६ जानेवारीपासून जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील डाॅक्टर्स, परिचारिका तसेच अन्य कर्मचारी यांच्यासाठी काेरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरूवात झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पहिल्या फळीतील कोरोना योद्धे महसूल कर्मचारी, पोलीस आणि अन्य पहिल्या फळीत काम करणाऱ्या व्यक्तिंना लस देण्यास सुरुवात झाली. पाठोपाठ गंभीर आजार असलेल्या व्यक्तिंना (कोमाॅर्बिड) लस देण्यास प्रारंभ झाला. १ मार्चपासून ६० वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले आहे.
या काळात काही व्यक्तिंना पहिला डोस मिळाला. मात्र, दुसरा डोस घेण्याच्या वेळीच नेमका लसचा पुरवठा कमी होऊ लागला त्यामुळे काहींना पहिल्या डोससाठी, तर काहींना दुसऱ्या डोससाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
आता तर १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तिंनाही लस देण्यास सुरुवात झाली आहे. या वयोगटातील व्यक्तींप्रमाणेच पहिला डोस घेणाऱ्यांनाही ऑनलाईन नोंदणी करावी लागत आहे. मात्र, दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाऊन नोंदणी करून लस घेता येते. असे असले तरी लस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने लसीची तारीख निश्चित होताच प्रत्यक्ष या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून नागरिक केंद्रावर रांग लावतात. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही दोन डाेसमध्ये निश्चित कालावधीपेक्षा अधिक कालावधी उलटण्याची भीती वाटू लागल्याने त्यांचीही गर्दी वाढलेली दिसते. मात्र, त्यामुळे इतरांप्रमाणेच या नागरिकांनाही तासनतास लसीकरण केंद्रावर थांबून राहावे लागते.
काही वेळा केंद्रांवर लसचा अपुरा साठा आला, तर या ज्येष्ठांना पुन्हा खेपा माराव्या लागतात. या ज्येष्ठांमध्ये मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आदी आजारांचे रुग्ण असल्याने लस मिळावी, यासाठी त्यांची ओढाताण होत आहे. त्यामुळे पहिला किंवा दुसरा डोस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग लावण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात येत आहे.