सेनेत पक्षांतर्गत धूसफूस सुरुच

By Admin | Updated: October 9, 2014 23:03 IST2014-10-09T22:25:57+5:302014-10-09T23:03:45+5:30

विधानसभा निवडणूक : पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारापासून लांब

In the senate party | सेनेत पक्षांतर्गत धूसफूस सुरुच

सेनेत पक्षांतर्गत धूसफूस सुरुच

रत्नागिरी : पक्षांतरानंतर पालकमंत्री उदय सामंत यांना शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक रिंगणात उतरविल्यानंतर आजही सेनेचे काही पदाधिकारी व शिवसैनिक प्रचारापासून लांब असल्याचे दिसून येत आहे़ नेते कितीही सांगत असले तरी आज सेनेत पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणावर धूसफूस सुरू असल्याचे नजरेत येत आहे़
लोकसभा निवडणुकीत सेना -भाजप युतीने रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये ३१ हजारांचे मताधिक्य घेतल्याने विकासकामेही वाहून गेली होती़ त्याचा धसका काँग्रेस आघाडी शासनातील मंत्री आणि दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतल्याने पक्षांतराचे वारे वाहू लागले होते़ त्याचा परिणाम या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिसून आला. काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये, तर राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करुन सर्वांनाच धक्का दिला़
सामंत यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यानंतर सच्चा शिवसैनिकाचे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता़ तोच प्रश्न आताही शिवसैनिक व पदाधिकारी एकमेकांना करीत
आहेत़
तसेच जनताही कोलांटउड्या मारणाऱ्यांवर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न अनेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना करीत असल्याने प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांना या बाबीला तोंड द्यावे लागत आहे़
आदेश आल्यानंतर शिवसैनिक व पदाधिकारी जसे जोमाने प्रचाराला वाहून घेतात, तसे चित्र कमीच पाहायला मिळत आहे़ यामध्ये शिवसेनेचे काही पदाधिकारी प्रचारापासून लांबच राहात असल्याचे दिसून येत आहे़ युती तुटल्याने त्याचा परिणाम खोलवर दिसून येत आहे. आदेशावर पक्ष चालत असला तरी खासगीत अनेक पदाधिकारी आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत़
निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम असल्याने ग्रामीण भागामध्ये बैठका, घरोघरी प्रचारामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते गुंतले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून परिषद भवनातील दुसऱ्या मजल्यावर एक वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्हा परिषदेतील माजी पदाधिकारी आणि विद्यमान सदस्य शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना घेऊन मार्गदर्शन करताना दिसतात. त्यामुळे गावात न जाता या खासगीत चाललेल्या बैठकांचे गमक म्हणजे नाराजी नव्हे ना? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात केला जात आहे. शिवसेनेतील या नाराजीचे प्रत्यंत्तर १९ तारखेला होणाऱ्या निवडणूक निकालात येईल, असे खासगीत म्हटले जात आहे. (शहर वार्ताहर)

उदय सामंत यांच्या शिवसेना प्रवेशामुळे एकीकडे नाराजी पसरली असताना दुसरीकडे शिवसेनेतील एका गटाचा सामंत यांच्या अवतीभवती वावरणाऱ्या आणि त्यांच्यासोबत आलेल्या राष्ट्रवादीतील काही स्वघोषित पुढाऱ्यांना विरोध आहे. सामंत यांच्या अवतीभवती वावरणाऱ्या या पुढाऱ्यांमुळे शिवसेनेचे नुकसान होईल, शिवसेनेची प्रतिमा खराब होईल, अशी भीती शिवसेना कार्यकर्ते खासगीत व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे ही नाराजी आगामी काळात सामंत कशी दूर करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: In the senate party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.