सेनेत पक्षशिस्त खुुंटीला?
By Admin | Updated: September 27, 2015 00:45 IST2015-09-27T00:45:18+5:302015-09-27T00:45:41+5:30
जुना - नवा वाद : जिल्हा नेत्यांची अळीमिळी गुपचिळी

सेनेत पक्षशिस्त खुुंटीला?
रत्नागिरी : रत्नागिरीप्रमाणेच संगमेश्वर तालुक्यातही शिवसेनेतील नव्या - जुन्या कार्यकर्त्यांमधील अंतर्गत संघर्ष वाढीस लागले आहेत. संघटनेतील कुरघोडीच्या या राजकारणातून निर्माण झालेली ही संघर्षाची साथ जिल्हाभर पसरल्यास जिल्हा शिवसेनेत बंडखोरी उफाळून येण्याची व तटबंदीची पडझड होण्याची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षादेश धुडकावणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने पक्षशिस्त खुंटीला टांगल्याची चर्चा आहे.
रत्नागिरी तालुक्यातील शिवसेनेत गेल्या वर्षभरापासून नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमधील वाद धुमसत आहे. हा वाद संगमेश्वर तालुक्यातही धुमसू लागला आहे. पदांसाठीच्या साठमारीत नव्या-जुन्यांच्या अस्तित्त्वाची लढाई सुरू झाली आहे. संगमेश्वर विभागातील अनेक नेते, कार्यकर्ते याआधी सेनेतून कॉँग्रेसमध्ये गेले होते.
ते कार्यकर्त्यांसह स्वगृही परतले असले तरी कार्यकर्त्यांत मनोमीलन झालेले नाही. नव्यांना पक्षात पुनर्वसन हवे आहे. रत्नागिरी तालुक्यात ज्या राजकीय पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून सेनेंतर्गत वातावरण पेटले आहे, तीच धग आता संगमेश्वर तालुका शिवसेनेतही निर्माण झाली आहे. ही धग जिल्हाभरात वणव्यासारखी केव्हा पसरेल, याची शाश्वती नसल्याचीही चर्चा आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्ते घाऊक प्रमाणात शिवसेनेत डेरेदाखल झाले. त्यामुळे सेनेच्या रत्नागिरीतील उमेदवाराचा विजय सोपा झाला असला तरी आता मात्र तालुका शिवसेनेत जुन्या - नव्या नेत्या - कार्यकर्त्यांतील वाद टिपेला पोहोचला आहे. सुरुवातीला छुप्यारितीने सुरू असलेले वाद आता जाहीररित्या पुढे येऊ लागले आहेत. शिवसेनेत शिस्त महत्त्वाची आहे, आदेश मानला जातो, असे सांगणाऱ्या सेनेच्या नेत्यांना नाचणे ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्याच काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून आव्हान दिले.
शिवसेनेत पक्षादेश धुडकावण्याची हिंमत आजवर कोणी केली नव्हती. परंतु, नाचणेसारख्या एका ग्रामपंचायतीत शिवसेनेने सर्व जागा जिंकल्या असल्या तरी अंतर्गत कुरबुरी पक्षनेत्यांना थांबवता आल्या नाहीत. या ग्रामपंचायतीवर सेनेचे सर्व १७ सदस्य निवडून आलेले आहेत. शिवसेनेने उपसरपंचपदासाठी भय्या भोंगले यांचे नाव निश्चित करून त्यांच्या विजयासाठी सेनेच्या सदस्यांना पक्षादेश बजावला होता. तो धुडकावून सेनेचे दुसरे सदस्य कपील सुपल यांनी या पदासाठी अर्ज भरून बंडखोरी केली. अधिकृत उमेदवाराचा पराभव करून सुपल निवडून आले. त्यानंतर बंडखोरांना सोडणार नाही, कारवाई करणार असा इशारा जिल्हाप्रमुखांनी दिला होता. त्यानुसार ज्यांच्यामागे कोणाचे फारसे बळ नाही, अशा संदीप सुर्वे यांना शाखाप्रमुखपदावरून काढले. ही घोषणाही केवळ घोषणाच असल्याची चर्चा आहे. संदीप सावंत आजही शिवसेनेत आहेत. त्यामुळे पक्षादेशाच्या गप्पा हवेत विरल्या आहेत, असेच चित्र रत्नागिरीत पहायला मिळत आहे. (प्रतिनिधी)
रत्नागिरीत ताणातणी...
रत्नागिरी शिवसेनेतही जुन्या - नव्यांमध्ये वरवर मनोमीलन झाल्याचे दाखवले जात होते. मात्र, गणेशोत्सवात लावलेल्या फलकांवर एकमेकांच्या नेत्यांचे फोटोही गायब करण्यात आल्यामुळे जुन्या - नव्यांतील राजकारण पुन्हा तापले आहे. पुढील वर्षी जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील ही बेशिस्त सेनेला मारक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या फलकावरून शिवसेनेचे विद्यमान आमदार उदय सामंत यांचाच फोटो गायब झाल्याचे दिसत आहे. हा फलक शिवसेनेच्या कार्यालयासमोर लावल्याने सर्वांच्या नजरा त्याकडे जात आहेत.