फुलपाखरांच्या जैवविविधतेबाबत ५ रोजी परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST2021-07-01T04:22:22+5:302021-07-01T04:22:22+5:30

चिपळूण : येथील वन विभाग आणि मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांच्या संयुक्त विद्यमाने देवरुख (संगमेश्वर) येथे, परसदारी फुलपाखरू ...

Seminar on Butterfly Biodiversity on 5th | फुलपाखरांच्या जैवविविधतेबाबत ५ रोजी परिसंवाद

फुलपाखरांच्या जैवविविधतेबाबत ५ रोजी परिसंवाद

चिपळूण : येथील वन विभाग आणि मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांच्या संयुक्त विद्यमाने देवरुख (संगमेश्वर) येथे, परसदारी फुलपाखरू उद्यान ही संकल्पना यशस्वी करणारे वन्यजीव अभ्यासक प्रतीक मोरे यांचे ५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ‘रत्नागिरी जिल्ह्यातील फुलपाखरांची जैवविविधता, संवर्धन आणि उद्यान निर्मिती’ या विषयावर महत्त्वपूर्ण परिसंवाद व व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्थेच्या सहकार्याने मोरे यांनी साद निसर्गाची अंतर्गत याच विषयावर विशेषांक लेखन केले आहे. ते गेली ७ वर्षे यावर अभ्यास करत आहेत. मानव आणि प्राणी संघर्ष, देवराई संवर्धन, हॉर्नबील, कोकणातील सड्यांची जैवविविधता यावर संशोधन करत असलेले मोरे या परिसंवादामधून ‘फुलपाखरांचे विश्व’ उलगडून सांगणार आहेत. फुलपाखरे हा निसर्गाने निर्माण केलेला एक अद्भुत आविष्कार आहे. विविध आकार आणि रंगांच्या फुलपाखरांना कॅमेऱ्यात पकडणेही कठीण असते. रंगीबेरंगी फुलपाखरांची छायाचित्रे टिपण्यासोबत व त्यांचा अभ्यास करण्यासाठी मोरे यांनी आपल्या घराजवळ फुलपाखरांसाठी उद्यान तयार केले आहे.

घराजवळ किंवा परसबागेत कोकणी माणूस हमखास काम करतो. तो घराजवळ नारळ, पोफळी, केळी, मोगरा, अबोली, जास्वंदी, गुलाब लावतो. या झाडांमध्ये आणखी काही विशिष्ट फुलझाडे लावली तर फुलपाखरू उद्यान तयार होऊ शकते, असे मोरे सांगतात. फुलपाखरांना जगण्यासाठी झाड आणि ऊन-सावलीची आवश्यकता असते. म्हणून फुलपाखरांसाठी बागेत थोडे ऊन, थोडी सावली, थोडा दमटपणा आणि पाण्याची सोय एवढ्या गोष्टी असायला हव्यात. यामुळेच मोरेंच्या घराभोवती पिंगा घालणारी फुलपाखरे हा परिसरातील अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे. या परिसंवादमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व पर्यावरण आणि फुलपाखरूप्रेमी जिज्ञासूंनी Video call link : https://meet.google.com/ccm-nfmg-gfs या लिंकद्वारे या कार्यक्रमाचा ५ जुलै रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्ह्याचे विभागीय वनाधिकारी दीपक खाडे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांनी केले आहे.

Web Title: Seminar on Butterfly Biodiversity on 5th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.