विलास गांगण यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:34 IST2021-09-23T04:34:40+5:302021-09-23T04:34:40+5:30
राजापूर : तालुक्यातील रायपाटण गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच विलास गांगण यांची सर्वानुमते निवड झाली आहे. तंटामुक्त समितीचे ...

विलास गांगण यांची निवड
राजापूर : तालुक्यातील रायपाटण गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच विलास गांगण यांची सर्वानुमते निवड झाली आहे. तंटामुक्त समितीचे दुसऱ्यांदा अध्यक्षपद गांगण भूषविणार आहेत. अभ्यासू व्यक्तिमत्त्व व उत्तम प्रशासक अशी त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. गांगण यांच्या निवडीबद्दल काैतुकाचा वर्षाव होत आहे.
जनकल्याणची वार्षिक बैठक
राजापूर : तालुका जनकल्याण सहकारी पतसंस्थेची १६ वी वार्षिक अधिमंडळ बैठक रविवार, दि. २६ सप्टेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश पाजवे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता बैठक होणार असून, त्यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मासेमारी रोखण्यासाठी कारवाई
रत्नागिरी : अवैध मासेमारी करणाऱ्या नाैका ज्या मच्छीमार सहकारी संस्थेच्या सदस्य असतील, त्या संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सहायक मत्स्य विभागाकडून सर्व मच्छीमार सहकारी संस्थांना देण्यात आली आहे. ३५१९ यांत्रिकी व ४४२ बिगर यांत्रिकी नाैका मासेमारी करतात.
पांगरी घाट धोकादायक
रत्नागिरी : तळेकांटे-देवरूख मार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. सध्या पांगरी घाटात कटिंगचे काम सुरू झाले आहे. या कामामुळे चिखल रस्त्यावर आला असून, या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. वळणावर मोठ्या प्रमाणावर चिखल रस्त्यावर आला आहे. हा चिखल पाण्याने धुऊन टाकण्याची मागणी होत आहे. चिखलाचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
मानधनाची मागणी
खेड : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील कलावंतांना मानधन मिळावे, अशी मागणी खेड तालुका वारकरी संप्रदायातर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन खेड तहसीलदारांना देण्यात आले आहे. कोरोनामुळे भजन, कीर्तन, प्रवचन या माध्यमातून होणारे समाजप्रबोधनाचे काम बंद असल्यामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.