निवड मंडळ स्थापन करणार नाही

By Admin | Updated: October 20, 2016 01:02 IST2016-10-20T01:02:32+5:302016-10-20T01:02:32+5:30

शेखर निकम : पक्षात आणखी वाद नकोत; आपापली जबाबदारी ओळखून पक्ष वाढवा

The selection board will not be established | निवड मंडळ स्थापन करणार नाही

निवड मंडळ स्थापन करणार नाही

चिपळूण : नगर परिषद निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर त्या त्या भागातील नेतेच योग्य भूमिका घेऊन निर्णय घेतील. कार्यकर्त्यांमधील संभ्रम टाळण्यासाठी आपण जिल्हा निवड मंडळ स्थापन करणार नाही. मात्र, सर्वच नगर परिषदांवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी केले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीचे अधिकार दूरध्वनीद्वारे माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांना दिले आहेत, तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्हा प्रभारींसह निवड मंडळ बनवण्यासाठी आपल्याला पत्र दिले आहे.
या दोन वेगवेगळ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. यातून पक्षाचे नुकसान होणार आहे. नगर परिषद निवडणुका जिंकणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे माजी आमदार कदम यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी काम करावे. आचारसंहिता सुरु झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयातून आपल्याला जिल्हा निवड मंडळ बनवण्यासाठी सूचना पत्र दिले, असे ते म्हणाले.
दरम्यान, याबाबत अजमेर येथे गेलेले माजी आमदार कदम यांनी चिपळूणमधील उमेदवार ठरवण्याचे अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष पवार यांनीच आपल्याला दिल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. त्यामुळे उमेदवारी अर्ज नक्की कोणाकडे द्यायचे, यावरून गोंधळ निर्माण झाला असून, कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
हा वाद असाच वाढत जाईल, त्यामुळे या वादात पडण्यापेक्षा त्या त्या पातळीवरील पक्षाच्या नेत्यांनी त्याबाबत निर्णय घ्यावा. मात्र, सत्ता येईल, असे पाहावे, असे त्यांनी सांगितले.
नगर परिषद निवडणुकीत जिल्ह्यातील गटबाजी संपवण्यासाठी आम्ही दिवस-रात्र झटत होतो, काम करत होतो. परंतु, वरिष्ठ नेत्यांनी अशी दुटप्पी भूमिका घेतल्याने अडचण झाली आहे. सगळ्यांना समोर बसवून निवडणुकीबाबत योग्य तो निर्णय घेणे सहज शक्य झाले असते. मात्र, तसे झाले नाही. त्यातच आता जिल्हा निवड मंडळ तयार करुन आणखी अडचण नको म्हणून आपण जिल्हा निवड मंडळ जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सर्वच तालुक्यातील पक्षाच्या नेत्यांनी आपल्या भागातील निवडणुकीवर लक्ष केंद्रित करुन नगर परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्याच्या दृष्टिने कसोशीने प्रयत्न करावेत, असेही निकम यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

जितेंद्र चव्हाण यांचा रामराम
चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांचे खंदे समर्थक, चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती, विद्यमान सदस्य व राष्ट्रवादीचे गटनेते जितेंद्र ऊर्फ पप्या चव्हाण यांनी बुधवारी राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाला कंटाळून आपल्या पक्ष सदस्यत्त्वाचा व गटनेतेपदाचा राजीनामा तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांच्याकडे दिला आहे.
माजी मंत्री व आमदार भास्कर जाधव हे पायाला भिंगरी बांधून निष्ठेने दिवस-रात्र पक्षासाठी तळमळीने काम करत असतात. त्यांच्यामुळेच मागच्या वेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीत राष्ट्रवादीला यश मिळाले. गेल्या निवडणुकीत त्यांनी शहर विकास आघाडी स्थापन केली म्हणून राष्ट्रवादीला सत्ता मिळाली. नाहीतर नगर परिषदेवर शिवसेनेची सत्ता आली असती. पंचायत समितीत जाधव यांना मानणारे दोन अपक्ष निवडून आले. म्हणून पंचायत समितीची सत्ता आली. याचे भान ठेवायला हवे. पक्षासाठी दिवसभर काम करणाऱ्या व पक्षासाठी कष्ट करणाऱ्या आमदार जाधव यांचीच पक्षाकडून अवहेलना होणार असेल तर ते अयोग्य आहे. आम्ही ते अजिबात खपवून घेणार नाही. राष्ट्रवादीतील या अंतर्गत गटबाजीचा आपल्याला कंटाळा आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आमदार जाधव यांनी प्रत्येक तालुक्यात मेळावे घेतले, शिबिरे घेतली, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. परंतु, निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांनी पक्षवाढीसाठी तालुक्यात साधा मेळावा घेतला नाही किंवा बैठकाही घेतल्या नाहीत. अशा नेत्यांकडे सूत्र दिली असल्याने पक्षाला यश मिळणार कसे? पक्षातील अंतर्गत वादामुळे पक्षाची हानी होत आहे. त्यामुळे या पक्षात काम करणे अवघड झाले आहे. म्हणून आपण आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले. आमदार जाधव यांचे समर्थक म्हणून अनेकांनी छाती बडवली तरी जाधव यांच्या अडचणीच्या काळात सदस्य चव्हाण हेच खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहिले. आजही त्यांनी राजीनामा दिला. असा त्याग करणारे ते एकमेव असल्याचे एका कार्यकर्त्याने सांगितले. (प्रतिनिधी)
 

Web Title: The selection board will not be established

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.