रत्नागिरी : सागरी सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने पर्ससीन मच्छीमार, किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकामे, देशद्रोही कारवाया, यावर बारीक लक्ष राहणार आहे. इथल्या मच्छीमारांचे नुकसान होऊ नये, यासाठी एलईडी मच्छीमार नाैकांवर तत्काळ कारवाई करून त्या जप्त करण्याचे आदेश मत्स्य विभागाला देण्यात आले आहेत, अशी माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.रत्नागिरी जिल्ह्याच्या दाैऱ्यावर आलेले मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी येथील शासकीय विश्रामगृह येथे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभागाचा आढावा घेतला. बैठक झाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या आढावासंदर्भात त्यांनी विश्रामगृह येथे पत्रकारांना माहिती दिली.ते म्हणाले, देशात येत्या काळात मत्स्य उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, देश या उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर कसा जाईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाच वर्षांच्या कालावधीत मत्स्य उत्पादन जास्तीत जास्त वाढविण्याचा प्रयत्न आहे. यासाठी काही कार्यक्रम आखण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
सागरी सुरक्षा महत्त्वाची आहे. हा विभाग माझ्याकडे असल्याने त्याविषयी १०० टक्के अंमलबजावणी करण्याची जबाबदारी माझ्या विभागाची आहे. या विभागात पारदर्शकता यावी, मत्स्य उत्पादन वाढावे, बंदरांचा विकास व्हावा आणि मच्छीमारीचे प्रमाण वाढावे, यादृष्टीने या बैठकीत आढावा घेतल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.बंदरांचा विकास मत्स्य उत्पादन वाढविणे आणि सागरी सुरक्षा यादृष्टीने केला जात आहे. त्यासाठी दोन्ही सरकारची गुंतवणूक आहे. पण, या बंदरांचा किंवा किनारपट्टींचा उपयोग कुणी देशाच्या विरोधात करू नये. याबाबतची माहिती आली होती, ती संबंधित विभागाकडे चाैकशीसाठी देण्यात आल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. या खात्याच्या माध्यमातून शिस्त लावणे हे आमचे काम आहे. नियमाच्या बाहेर एकही गोष्ट होणार नाही. अनधिकृत गोष्टींवर कारवाई होईलच, पण त्याला जो अधिकारी मदत करेल, त्यालाही सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
स्टीलची गस्ती नाैका
सध्या एकच गस्ती नाैका आहे. त्यामुळे नवीन स्टीलची गस्तीनाैका घेण्याचा निर्णय झाला आहे. ड्रोनमुळे आता कारवाया सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले. रत्नागिरीत सध्या बांगलादेशी आढळत आहेत, त्याबाबतही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.