पगाराच्या अनियमिततेमुळे माध्यमिक शिक्षक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:35 IST2021-08-21T04:35:59+5:302021-08-21T04:35:59+5:30
वाटूळ : कोरोनामुळे गतवर्षी एप्रिल २०२० पासून जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार विलंबाने हाेऊ ...

पगाराच्या अनियमिततेमुळे माध्यमिक शिक्षक हैराण
वाटूळ : कोरोनामुळे गतवर्षी एप्रिल २०२० पासून जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार विलंबाने हाेऊ लागले आहेत. दरमहा वेतनात हाेणाऱ्या विलंबामुळे शिक्षक हैराण झाले आहेत. पगार वेळेवर करण्याची मागणी करूनही त्यात सुधारणा हाेत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. हे वेतन वेळेवर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.
काेराेनामुळे शैक्षणिक क्षेत्रात बिकट परिस्थिती निर्माण झाली. काेराेनामुळे शाळा बंद हाेत्याच. मात्र, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारातही अनियमितता आली हाेती. काेराेनाची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी संयम ठेवत आपले आर्थिक प्रश्न सोडविले; परंतु दीड वर्ष लोटले तरीही कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला महिन्याचा शेवटचा आठवडा उजडत आहे. मागील अठरा महिने दरमहा वेतन महिन्याच्या २५ तारखेनंतरच जमा होत आहे. कर्मचाऱ्यांची कोणत्या ना कोणत्या कर्जाची परतफेड सुरू असून, त्याचे हप्ते महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँकेतून काढले जातात; परंतु वेळेत वेतन नसल्याने धनादेश बाउन्स होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नाहकच दंडाचा भुर्दंड साेसावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी वारंवार होणाऱ्या वेतनाच्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या एक तारखेला जमा व्हावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. आता १० सप्टेंबरपासून गणेशाेत्सव सुरू होत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन पहिल्याच आठवड्यात जमा व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.