दुय्यम निबंधक लाचप्रकरणी गजाआड
By Admin | Updated: October 21, 2016 01:13 IST2016-10-21T01:13:04+5:302016-10-21T01:13:04+5:30
मंडणगड येथील घटना : एजंटलाही अटक

दुय्यम निबंधक लाचप्रकरणी गजाआड
मंडणगड/ चिपळूण : मंडणगड येथील तहसील कार्यालयाबाहेर एका मोकळ्या पटांगणात २० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दुय्यम निबंधक चंद्रकांत तुकाराम आंबेकर आणि त्याचा एजंट नितीन मोरे या दोघांना अटक करण्यात आली आहे. खरेदी खताची दस्तनोंदणी करण्यासाठी आंबेकर याने ही लाच मागितली होती.
मंडणगडमध्ये एका कंपनीसाठी पुणे येथील एका प्रतिनिधीने जागा खरेदी केली. या खरेदीखताची दस्तनोंदणी करण्यासाठी लोकसेवक दुय्यम निबंधक श्रेणी-१चे चंद्रकांत तुकाराम आंबेकर (वय ५२) याने २० हजार रुपये लाच मागितली होती. ही रक्कम त्याने एजंट नितीन मोरे (रा. सोवेली, ता. मंडणगड) याला स्वीकारण्यास सांगितली. आंबेकर याच्या सांगण्यावरून मोरे याने २० हजार रुपये तक्रारदार यांच्या खासगी वाहनात स्वीकारली. त्यामुळे आंबेकर व त्याचा एजंट मोरे या दोघांना गुरुवारी(दि.२०) ४.०५ वाजता तहसील कार्यालय मंडणगड या इमारतीमधील दुय्यम निबंधक कार्यालय येथे रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत पोलिस उपअधीक्षक सतीश गुरव, पोलिस निरीक्षक सोनवणे, तळेकर, सहाय्यक पोलिस फौजदार गौतम कदम, पोलिस हवालदार संतोष कोळेकर, दिनेश हरजकर, संदीप ओगले, पोलिस नाईक नंदकिशोर भागवत, प्रवीण वीर, जयंती सावंत, योगेश हुंबरे यांचा सहभाग होता. (वार्ताहर)