सलग दुसऱ्या वर्षी कर्ला-आंबेशेत मिरवणुकीला विराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST2021-09-11T04:32:20+5:302021-09-11T04:32:20+5:30
रत्नागिरी : शहराजवळील कर्ला आंबेशेत गावातील गणेशमूर्ती मिरवणुकीला एक आगळेवेगळे महत्त्व आहे. एकाच गावातील हे गणपती एका रांगेत नेताना ...

सलग दुसऱ्या वर्षी कर्ला-आंबेशेत मिरवणुकीला विराम
रत्नागिरी : शहराजवळील कर्ला आंबेशेत गावातील गणेशमूर्ती मिरवणुकीला एक आगळेवेगळे महत्त्व आहे. एकाच गावातील हे गणपती एका रांगेत नेताना दिसणारे दृश्य विलाेभनीय असते. सलग ३४ वर्षे ही मिरवणूक सवाद्य काढण्यात येत हाेती. मात्र, गतवर्षीपासून काेराेनामुळे ही मिरवणूक खंडित झाली. काेराेनाच्या निर्बंधामुळे ग्रामस्थांनी आपापल्या वाहनांतूनच मूर्ती नेल्याने मिरवणुकीचा साज पाहायला मिळाला नाही.
कर्ला, आंबेशेत गावातील ग्रामस्थ दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर चाैकात गावातील सर्व गणेशमूर्ती एकत्रित आणतात. स्वा. सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार व श्रीफळ अर्पण केल्यानंतर सवाद्य मिरवणुकीला प्रारंभ होतो. सकाळी ९ वाजता ही मिरवणूक गोखले नाका, बसस्थानक जयस्तंभ मार्गे कर्ला येथे रवाना होते. कर्ला येथे मिरवणुकीचे स्वागत करण्यात येते. घरोघरी मूर्ती विराजमान होण्यास दुपार होते. परंतु, एकत्रित दीडशे गणेशमूर्ती हातगाडीरून नेण्यात येतात, तेव्हा ही मिरवणूक पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी मिरवणुका न काढता वाहनातून गणेशमूर्ती नेण्यात आल्या. सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून भाविकांनी गणेशमूर्ती वाहनातून घरी नेल्या.