सील काढून गाळा केला सुरु

By Admin | Updated: May 25, 2015 00:38 IST2015-05-24T22:05:04+5:302015-05-25T00:38:19+5:30

देवरूख नगरपंचायत : कठोर कारवाईसाठी मनसे आक्रमक

The seal started to scratch | सील काढून गाळा केला सुरु

सील काढून गाळा केला सुरु

देवरुख : देवरुख नगरपंचायतीने सील केलेला दुकानाचा गाळा ते सील तोडून पुन्हा सुरु करण्यात आला आहे. या प्रकाराबाबत देवरुख मनसेने ताठर भूमिका घेत कठोर कारवाईची मागणी केल्यानंतर नगरपंचायत प्रशासन जागे झाले आहे.
देवरुखातील महाडिक स्टॉप येथील चार दुकानगाळ्यांना मार्च महिन्यात सील ठोकण्यात आले होते. हे गाळे अनधिकृतपणे उभारल्याने नगरपंचायतीने ही कारवाई केली होती. त्यानंतर या दुकानदारांनी देवरुखच्या मुख्याधिकारी शिल्पा नाईक यांची भेट घेऊन या गाळ्यांचे भाडे घ्यावे व नगरपंचायतीने सील काढावे, अशी मागणी केली होती. यावेळी एका महिन्यात आपण कार्यवाही करु, तोपर्यंत शांत बसण्याचे आवाहन नाईक यांनी केले होते. महिना संपला तरीही नगरपंचायतीने कार्यवाही न केल्याने काही व्यापाऱ्यांनी पुन्हा मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, प्रशासनाने पुन्हा चालढकल केली. अखेर या चार गाळ्यांपैकी दुचाकी मेकॅनिक पांचाळ यांनी दुकानाचे सील तोडून आपला व्यवसाय सुरु केला आहे. त्याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून, अनधिकृत गाळे उभारणाऱ्यांवर नगरपंचायतीने कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रश्नाबाबत नगराध्यक्षा स्वाती राजवाडे यांची भेट घेऊन मनसेने विचारणा केली असता सील लावण्यापासूनचे सर्व अधिकार प्रशासनाला असल्याचे राजवाडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

प्रशासनाने लावलेले सील तोडणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास मनसेही आपल्या स्टाईलने अनधिकृतपणे बांधकामे उभी करेल, असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे. त्यामुळे देवरुख नगरपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नगरपंचायतीने सील केलेला गाळा पुन्हा सुरु करण्याचा प्रकार खूपच गंभीर आहे. येत्या सोमवारी नगरसेवक व सदस्यांची बैठक होणार असून, बैठकीत संबंधितांविरुद्ध कारवाईबाबत पावले उचलली जातील.
- स्वाती राजवाडे,
नगराध्यक्ष, देवरुख

Web Title: The seal started to scratch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.